You are currently viewing स्मृति भाग ६४

स्मृति भाग ६४

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ६४* 

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

सन्यासांनी राग टाळावा , अन्यथा त्याला दण्ड धारण करण्याचा अधिकार नाही ! कारण रागाने आक्रान्त चित्त ज्याप्रमाणे वायूने प्रताडित केलेल्या जललहरी क्षणभरही स्थिर राहू शकत नाही ! , तसे ते स्थिर राहू शकत नाही .

एवढी सुंदर उपमा सुचायलाही अधिकारच लागतो ना ? पुढे सन्यासांनी ब्रह्मचर्य पाळले पाहिजे व अष्टधा मैथुन टाळले पाहिजे , यावर जोर दिलाय . १)स्त्रीचे स्मरण , २)तिच्याशी चर्चा , ३)तिच्यासह क्रीडा , ४)तिला सतत पहात रहाणे , ५)तिच्याशी एकांतात गोष्टी करणे ,६)तिच्याशी संबंधांचा विचार करणे , ७)तसा प्रयत्न करणे व ८) प्रत्यक्ष संबंध करणे , हे अष्टधा मैथुन आहे .

ऐकलेली कथा आहे. एकदा भगवान बुद्धांनी शिष्यांना उपदेश केला व प्रसारासाठी पाठवले . जो प्रथम दिसेल त्यापासून सुरवात करा , असे सांगितले . शिष्य प्रसारासाठी बाहेर पडले . एका शिष्यास प्रथमच वेश्या भेटली . ती त्याला तिच्या घरी घेवून गेली . त्याला न्हाऊमाखू घालणे , जेवण भरवणे , नाना चेष्टा करणे , मन वळवण्याचा यत्न करणे , अशी नानाप्रकारे तिची आळवणी सुरु होती . इकडे बरेच शिष्य परत आले होते . याच्या वर्तनाची वाईट वार्ता सर्व दूर पसरली होती . शेवटी एक दिवस उजाडला व त्यादिवशी त्या शिष्यासह ती वेश्या भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी आली ती कायमचीच शिष्या म्हणून !! त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणाले , ” वीतरागी असा असावा ” . ते खूष होते . थोडक्यात *वीतरागी* म्हणजे *सर्व सुखाचे आगर समोर असतांना समोरच्यास देव अथवा अध्यात्म समजावून त्यास सन्मार्ग दाखवण्याची शक्ति ज्यात असते तो वीतरागी !* सन्यासी इतका विरक्त असावा !! हे ऐकल्यावर पुन्हा रंभा—शुक संवाद डोळ्यासमोर अलगत तरळल्याशिवाय रहात नाही !! पण सध्या बव्हंशी महाराजच जेलमधे ?? शिष्य सोडूनच द्या !!!!! कठीण आहे .

ध्यान , शौच , भिक्षा व एकान्तशीलता ही चारच कर्मे सन्याशाची सांगितली आहेत व ” पाचवे नाहीच ! ” अशी टिप्पणी ही शेवटी केली आहे .

ध्यान आणि योगाने निपुण योगीयांना सकल गोष्टी शक्य होतात . ते जिथे रहातील ते घर पवित्र होईल व त्या घरातील सर्वांची पापे क्षालन होतील ! असेही सांगून पुढे द्वैताद्वैताचा श्लोक येतो .

 

*द्वैतञ्चैव तथाद्वैतं द्वैताद्वैतं तथैव च ।*

*न द्वैतं नापि चाद्वैतमित्येतत् पारमार्थिकम् ॥*

द्वैत , अद्वैत व द्वैताद्वैत या तीनच विचारधारा आहेत . द्वैत पण नाही व अद्वैतपण नाही , तर द्वैताद्वैतच पारमार्थिक म्हणजेच सत्य आहे .

येवढे वाचल्यावर पुढील भाग गळलेला वाटतो . इथे दक्षस्मृति संपते . उद्या पुन्हा नव्या दमाने नवीन स्मृति !! आवडेल ना ?

तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा