आसोली ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे मोठ्या दिमाखात उद्घाटन…
वेंगुर्ले
गावच्या विकासासाठी ग्रामस्थांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. त्यासाठी ग्रामपंचायत कार्यकारणीला सर्वतोपरी सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन जिल्हा परिषद माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादा कुबल यांनी आज येथे केले.
दरम्यान माझ्या राजकीय यशात आसोलीतील ग्रामस्थांचे मोलाचे योगदान आहे. अनेक निवडणुकीत त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. त्यामुळे भविष्यात गावाच्या विकासासाठी कोणीही नुसती हाक जरी दिली, तरी मी धावत येईन, असा शब्दही त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिला. आसोली गावात नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या इमारतीचे उद्घाटन सरपंच रिया कुडव यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी श्री. कुबल बोलत होते.
यावेळी पंचायत समिती माजी सभापती सुनील मोरजकर, गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, उपसरपंच विकी केरकर, सदस्य संकेत धुरी, श्री. देऊलकर, सौ. कुडव, सौ. डिसोझा, मोचेमाड सरपंच सौ.पालव, ग्रामसेवक श्री.पवार, तंटामुक्ती अध्यक्ष उदय धुरी, सदानंद गावडे, संजय गावडे, आत्माराम घाडी, गुरुनाथ घाडी, बाबू घाडी, ग्रामपंचायत कर्मचारी विद्याधर जाधव, शांताराम मुळीक, सुरेश धुरी, विजय धुरी, आनंद धुरी, प्रकाश धुरी आदींसह मोठ्या संख्येने ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री. कुबल पुढे म्हणाले, मी जिल्हा परिषद सदस्य असताना आसोली गावातील अनेक विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. याची जाण येथील ग्रामस्थांनी सुद्धा तेवढीच ठेवली. त्यामुळेच माझ्याकडे कोणतीही मोठे पद नसताना सुद्धा ते आपुलकीने मला गावातील कार्यक्रमात बोलवतात. तसेच एखादी मागणी माझ्याकडे हक्काने मांडतात. आणि त्यांनी केलेली मागणी पूर्ण करण्यासाठी मी सुद्धा सर्वतोपरी प्रयत्न करतो, असे त्यांनी सांगितले. तर फणसखोल सारख्या तत्कालीन अतिदुर्गम भागाला जोडणारा रस्ता मी माझ्या कारकिर्दीत मंजूर करून दिला. त्यावेळी काहींनी माझ्यावर टीका सुद्धा केली. मात्र आज त्या रस्त्यावरून जात असताना मला सुद्धा मोठा अभिमान वाटतो. कारण डोंगर पोखरून हा रस्ता उभारण्यात आला आहे. राजकारणात टीका या होतच असतात, मात्र चांगलं तेवढेच सोबत घेऊन जाण्याच्या सवयीमुळे मी कोणाच्या टीकेकडे त्यावेळी लक्ष दिले नाहीत. अशाप्रसंगी परमेश्वराला साक्षी ठेवून मी माझे काम करून दाखवले, अशी आठवणही त्यांनी याप्रसंगी बोलून दाखवली.
या प्रसंगी बोलताना श्री. मोरजकर म्हणाले, हा विकासाचा केंद्रबिंदू असतो. तर ग्रामपंचायत कार्यालय हा त्या गावाचा मानबिंदू आहे. असा गावाचा मानबिंदू उभारताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जागे अभावी ग्रामपंचायत उभारत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. मात्र सर्वांच्या प्रयत्नामुळे आणि येथील गोपाळ घाडी यांनी अल्प मोबदल्यात जागा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रशस्त अशी इमारत या ठिकाणी उभी राहू शकली. तरी भविष्यात सुद्धा सर्वांनी असेच सहकार्यातून पुढे गेले पाहिजे. गावाच्या विकासासाठी कोणीही आडकाठी न घेता पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी श्री. गावडे म्हणाले, आसोली गावाचा विकास हा धगधगत्या मशालीतून झाला आहे. गावात अनेक समस्या होत्या. मात्र त्या सोडवत आसोलीची एक वेगळी ओळख आम्ही निर्माण केली आहे. यातच गावातील ग्रामपंचायतीची नवीन इमारत उभारताना सुद्धा अनेक समस्या उद्भवल्या. त्या सर्वावर मात करून सर्वांच्या सहकार्याने आज प्रशस्त अशी आसोली ग्रामपंचायतची नवी इमारत उभी राहिली आहे. आता या इमारतीच्या छताखाली कार्यकारिणीने गावाच्या विकासाचा प्रगतशील आराखडा तयार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या इमारतीला स्थानिक आमदार निधीतून निधी दिल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचे कार्यक्रमात आभार मानण्यात आले. तर अल्प मोबदल्यात जागा उपलब्ध करून देणाऱ्या घाडी बंधूंचा तसेच ही इमारत पूर्णत्वास नेण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्वच ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व प्रमुख ग्रामस्थांचा यावेळी शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे निवेदन शुभम धुरी यांनी केले.