सावंतवाडी :
साडेचारशे वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ओटवणे येथील प्रसिद्ध संस्थानकालिन दसरोत्सवाला सोमवारी खंडेनवमीला थाटात प्रारंभ झाला. सावंतवाडी संस्थानकाळापासून राजेशाहीचा सण अशी ख्याती असलेल्या या दसरोत्सवासाठी जिल्ह्यासह भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दोन वर्षे कोरोनामुळे हा सण साधेपणाने साजरा करण्यात आला होता. मात्र यावर्षी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला.
दसरोत्सवाच्या या पर्वणीला हजारो भाविक रवळनाथ चरणी लिन झाले. देवस्थानच्या सर्व देवतांना भरजरी वस्त्रांसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा साज चढवण्यात आला. दसरोत्सवात वर्षातून एकदाच दर्शन घडणारे या देवस्थानचे सुवर्ण वैभव याची देही याची डोळा पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. या उत्सवासाठी सावंतवाडी कोषागारात असलेले या देवस्थानचे सुवर्ण अलंकार व तरंगाच्या मुर्त्या यावर्षी एक दिवस अगोदर सोमवारीच रवळनाथ मंदिरात आणण्यात आल्या. मंगळवारी सकाळी रवळनाथासह या देवस्थानच्या देवतांना भरजरी वस्त्रांसह सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात त्यानंतर दुपारी तिन्ही तरंगाना सप्त पितांबरीच्या वस्त्रांनी सजविण्यात आले. सायंकाळी सुवर्ण तरंगासह सवाद्य पालखी प्रदक्षिणा घातल्यानंतर शिव लग्न सोहळा झाला. यावेळी भाविकांनी सोने म्हणून लुटल्यानंतर तिन्ही तरंग देवतांच्या साक्षीने महिलानी क्लेशपीडा परिहार्थ अग्नि स्नान केले. या राजेशाही उत्सवात भाविकांना राजसत्ता आणि वैभवाचा साज पाहता आला. दसरोत्सवाची सांगता बुधवारी सायंकाळी खेम सावंत समाधी भेट व गाव रखवाल कौलाने सांगता होणार आहे.