*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल…. शब्दांकुर समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम लेख*
*माझी पहिली कविता*
आयुष्यात आनंदी राहण्यासाठी प्रत्येकाला एक छंद असावाच… हो, छंद नेहमीच आपले विचार जिवंत ठेवतो, मानसिक ताण तणावातून मुक्त करतो… प्रत्येक जण आपली आवडी जोपासतो…त्यासाठी वेळ काढतो… मित्र मैत्रिणी, सगे सोयरे, खेळ करमणूक हे नित्याचेच असतात, पण त्याहीपेक्षा माणसाला आत्मिक समाधान जर कुठल्या गोष्टींमध्ये प्राप्त होत असेल तर तो माणसाचा छंद…!
कॉलेजच्या जीवनापासून जोपासलेला माझा छंद म्हणजे चारोळी लेखन, काव्यलेखन…! कालांतराने कथा, ललीतलेख, सामाजिक लेख, वैचारिक लेख असं विविधांगी लेखन होत गेलं… परंतु मुख्य गाभा राहिला तो म्हणजे काव्यलेखन… आणि त्यात माझी पहिली कविता म्हणजे….
*एक स्वप्न*…!
पाहिलं होतं एक स्वप्न
तुझ्याच…
फक्त तुझ्याच मनी बसण्याचं
तुझ्याच हृदयी शिरण्याचं…
पाहिलं होतं एक स्वप्न
तुझ्याच…
फक्त तुझ्याच नयनी दिसण्याचं
तुझ्याच माथी सजण्याचं…
पाहिलं होतं एक स्वप्न
तुझ्याच…
फक्त तुझ्याच गाली खुलण्याचं
तुझ्याच ओठी हसण्याचं…
पाहिलं होतं एक स्वप्न
तुझ्याच…
फक्त तुझ्याच संगे जगायचं
तुझ्याच संगे मरायचं…
प्रत्येक जण आयुष्यात प्रेमात पडतोच..कुणी अभ्यासाच्या…कुणी मुलीच्या…तर कुणी आपल्या छंदाच्या. काही व्यक्त होता तर काही अव्यक्तच राहतात…कुणी फसतात तर कुणी फसवले जातात…! कॉलेजचे जीवन म्हणजे मुलगा मुलगी एक दुसऱ्याकडे आकर्षित होण्याचे दिवस(त्यावेळी आता वेळ काळ बदलला)…शाळेतून बाहेर पडताच पंख फुटलेली पाखरे हुंदडतात…मोहात फसतात तर कधी भाळतात एखाद्याच्या सौंदर्यावर आणि *प्रेम म्हणजे काय?* हे न समजतात…”वरलीया रंगा भुललासी” म्हणतात तसा… जीव लावून बसतात एखाद्या अनोळखी चेहऱ्याला…! त्याच्या रूपावर आकर्षित होतात…मन, स्वभाव काहीच ज्ञात नसतं, पण…”हीच आपलं सर्वस्व” असं मनोमन ठरवून स्वप्नात मश्गुल राहतात… आणि वास्तव आयुष्य जगायला सुरुवात करण्यापूर्वीच आयुष्य त्यांना जीवनभराचा धडा देऊन जातं… प्रेम आणि विश्वास यातलं मर्म सांगून जातं…अगदी तशीच कॉलेजच्या जीवनात लिहिलेली ही आयुष्यातील पहिली काव्यरचना…!
काव्याची संकल्पना प्रत्येक ओळीत, शब्दात समजून येतेच… प्रियकराचं त्याच्या प्रेयसीवरील उत्कट प्रेम काव्यरूपाने तो सांगण्याचा प्रयत्न करतो आहे… तिच्याच साठी सर्व काही करण्याचं अगदी तिच्या माथी सजण्याचं…जगण्याचं आणि संग मरण्याचं स्वप्न पाहतो… पाहिलेलं ते स्वप्न हृदयातून कागदावर उतरत आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहचविण्याचा एक प्रयत्न या कवितेतून केला होता… निर्मळ प्रेमभावना प्रत्येक शब्दातून व्यक्त होत आहेत…
मला काव्याची आवड निर्माण झाली ती माझ्या मानस बहिणीमुळे. ती खूप सुंदर काव्यरचना लिहायची…लिहिते… तिच्या रचना वाचता वाचता तिच्याकडून प्रेरणा घेत मलाही वाटू लागलं …*”आपण का लिहू नये?”* आणि तिथूनच माझ्या काव्यलेखनाला हळूहळू सुरुवात झाली. मी सायन्सचा विद्यार्थी…मराठीशी संबंध तुटलेला…परंतु लेखन करायचं म्हटलं आणि चारोळ्या…छोट्या छोट्या कविता लिहिण्याला सुरुवात झाली…मध्यंतरी नोकरी, व्यवसायामुळे लेखनाकडे दुर्लक्ष झाला परंतु नंतर मात्र लिहायला सुरुवात केली ती आजपर्यंत खंड न पडता.
कविता करताना मला तरी वाटते ती अंतरीतून स्फुरते…आणि जी अंतरीतून येते तिला तोड नसते, शब्दालंकार अप्रतिम असतात… माझ्या मते जोपर्यंत आपण त्या पात्रात, भूमिकेत शिरत नाही तोपर्यंत जीव ओतून आपण काव्य लिहू शकत नाही. ज्या विषयावर आपल्याला काव्य लिहायचं आहे ती भूमिका आपण जगली पाहिजे… तरच वाचकांच्या हृदयापर्यंत पोचणारी रचना आपण लिहू शकतो. आपल्या मनात एखाद्याबद्दल उपजत भावना आल्या तर त्या तेवढ्याच ताकदीने आपण कागदावर उतरवू शकतो. केवळ एखादा विषय दिला आणि त्यावर लिहायचं म्हणून त्या आशयाला न समजता, त्या आशयामध्ये स्वतःला झोकून न देता आपण उत्कृष्ट काव्यनिर्मिती करू शकत नाही. माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या, घडून गेलेल्या गोष्टी, माणसाचं जीवन, त्याची स्वप्ने, आयुष्यातील सत्य माणूस कागदावर शब्दरूपाने रेखाटतो तेव्हाच ते काव्य बनते…त्याला यमक, ताल, सूर जुळवावे लागत नाहीत तर ते आपोआप जुळतात.
आपल्या मनातील भावना कवी ज्यावेळी कागदावर उमटवितो आणि त्यावर रसिकांकडून जी दाद मिळते त्यावेळी कवीचा आनंद गगनात मावत नाही. आपण लिहिलेल्या शब्दांमधून सर्वप्रथम स्वतःला समाधान मिळाले पाहिजे… जेव्हा आत्मिक समाधान मिळते तेव्हाच ते वाचल्यावर इतरांकडून प्रतिक्रिया, प्रतिसाद येतो… तो खरा आनंद असतो…स्वतःच्या साहित्याचा इतरांनी घेतलेला आनंद पाहणे ही एक पर्वणी असते…आणि ती साहित्यिकांच्याच नशिबात येते.
माझी पहिली कविता आणि दुसरी कविता म्हणजे हिंदी काव्यरचना.. जाता जाता त्या दुसऱ्या कवितेच्या दोन ओळी ….
*”आकाश में एक तारा हैं…!*
*बडा प्यारा सा लगता हैं…!*
©【दीपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६