You are currently viewing गोवा राज्यातून चोरट्या पद्धतीने अवैधरित्या होणारी दारू वाहतूक बंद करा

गोवा राज्यातून चोरट्या पद्धतीने अवैधरित्या होणारी दारू वाहतूक बंद करा

अन्यथा इन्सुलीतील “एक्साईज” ऑफिससमोर १२ ऑक्टोबरला “डबे वाजवून” निषेध करू…

मनसे विभाग अध्यक्ष न्हावेली, मंदार नाईक यांचा इशारा

सावंतवाडी

गोव्यातून सिंधुदुर्गच्या दिशेने होणारी बेकायदा दारू वाहतूक कोल्हापूर येथील भरारी पथक रोखत आहे. परंतु सिंधुदुर्ग विभागाचे अधिकारी सुशेगाद आहेत. त्यामुळे या प्रकारामागे नेमके गौडबंगाल काय? असा सवाल करीत योग्य ती कारवाई करा, अन्यथा १२ ऑक्टोबरला इन्सुली “एक्साईज” तपासणी नाक्यासमोर “डबे वाजवा” आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे विभागीय अध्यक्ष मंदार नाईक यांनी दिला आहे. दारू मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने युवा पिढी बरबाद होत आहे. चोरी, मारामारी यासारखे प्रकार अवलंबले जात आहेत. अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे हा प्रकार रोखणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे.
यात असे नमुद केले आहे की, गोव्यातून मोठ्या प्रमाणात चोरट्या दारूची अवैद्य वाहतूक होत आहे. चेक पोस्ट असतानाही दारू मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात व राज्यात येत आहे. यामुळे आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे. व्यसन पूर्ण करायला त्यांना पैसा कमी पडत असला की चोरी, मारामारी यासारखे मार्ग अवलंबून आपल्या जीवनाची वाताहत करत आहे. व आपल्या कुटुंबाची बरबादी करत आहे. आज कोल्हापूर वरून येणारी तपासणी पथक सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करत आहेत. पण सिंधुदुर्गातील पथक मात्र देखाव्यासाठी कधीतरी कारवाई करून परत त्या विषयात लक्ष घालत नाही. आज जिल्ह्यात येणारी गोवा बनावटीची दारू ही सातार्डा, आरोंदा, बांदा या ठिकाणची चेक पोस्ट पार करून होते. या असल्या अवैध व्यवसायामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव बदनाम होत आहे. त्यामुळे या व्यवसायाविरोधात सदर खात्याला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा