माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची प्रमुख उपस्थिती; डॉ. अमेय देसाई यांची माहिती
वेंगुर्ला :
वेंगुर्ले कॅम्प येथील मधुसूदन कालेलकर सभागृहामध्ये 9 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत आर निधीतून किरात ट्रस्ट वेंगुर्ले, माझा वेंगुर्ला व अटल प्रतिष्ठान सावंतवाडी यांना देण्यात आलेल्या दोन रुग्णवाहीकांचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे कोकण विभाग वैद्यकीय आघाडी प्रमुख डॉ. अमेय देसाई यांनी रविवारी वेंगुर्ले येथे पत्रकार परिषदेत दिली.
रविवारी वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात डॉ. अमेय देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी किरात ट्रस्टच्या सीमा मराठे, माझा वेंगुर्लाचे अध्यक्ष निलेश चेंनवणकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई , मोहन वडावडेकर , प्रशांत आपटे, राजन गावडे, कपिल पोकळे आदी उपस्थित होते.
डॉ. देसाई यावेळी म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी यापूर्वी कुडाळ रोटरी क्लबला कार्डियाक ॲम्बुलन्स व्हॅन देण्यात आली आहे. आता वेंगुर्ले येथील किरात ट्रस्ट आणि माझा वेंगुर्ला यांना एक व सावंतवाडी येथील अटल प्रतिष्ठान साठी एक अशा दोन रुग्णवाहीका देण्यात आल्या आहेत. त्यांचे लोकार्पण 9 ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी के. मंजूलक्षमी उपस्थित राहणार आहेत.
या लोकार्पण कार्यक्रम पूर्वी महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. दुपारी 3 ते 6 यावेळेत हे शिबिर घेण्यात येईल. त्याचा सुमारे 300 ते 400 लोक लाभ घेतील अशी अपेक्षा आहे. या शिबिरात उषःकाल अभिनव मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगलीचे तज्ञ डॉ. मोफत तपासणी करणार आहेत. यावेळी प्राथमिक औषधोपचार ही मोफत देण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया करावी लागल्यास तीही सांगली येथील रुग्णालयात मोफत केली जाणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यात कोरोना कालावधीत गावपातळीवर काम केलेल्या पंचवीस डॉक्टर व कौन्सिलर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रचार भारती तर्फे सावंतवाडी येथील लाकडी खेळणी वर एक चित्रफित बनविण्यात आली असून त्याचे प्रकाशन ही यावेळी करण्यात येणार आहे, असे ही देसाई यांनी सांगितले. प्रशांत आपटे यांनी प्रास्ताविक तर निलेश चेंदवणकर यांनी आभार मानले.