You are currently viewing दुर्गे दुर्घट भारी

दुर्गे दुर्घट भारी

*दुर्गे दुर्घट भारी*

नवरात्र उत्सव सध्या देशभरात मोठ्या उत्साहात सर्वत्र सुरू आहे.
वर्षभर नसले तरी या नऊ दिवसांत माता भगिनींना देवीचे महत्व दिल्याचं भासवलं जातं. वर्षभर मात्र या सन्मानाचा समाजाला विसरच पडलेला असतो….असो

गेली काही वर्षे नवरात्रीत नऊ दिवस महिलांनी नऊ विविध रंगांच्या साड्या परिधान करण्याचा एक रिवाज रुजविण्यात आला आहे, उत्सव साजरा करण्याची एक परंपरा सुरू झालेली आहे.
पण देशातील समाजातील खऱ्या नवदुर्गा कोण हे सातत्याने शोधणे आणि नव्या पिढीसमोर ठेवणं हे वस्त्रांच्या रंगांपेक्षा कितीतरी महत्त्वाचे आहे.
अनेक महिला मोठ्या धाडसाने पुरुष प्रधान संस्कृतीने प्रभावित समाजात आपलं स्थान निर्माण करत आहेत.चांगलं कार्य करत आहेत यात शंका नाही.

या वर्षी मात्र विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलेचा जर उल्लेख करायचा म्हटलं तर सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ इंदिरा जयसिंग यांचेच नाव घ्यावे लागेल.
स्त्री हक्कांसाठी,महिलांविरोधी अन्यायाविरुद्ध सातत्याने कित्येक दशकं न्यायालयीन लढा देणाऱ्या इंदिरा जयसिंग मॅडममुळे यावर्षी नवरात्रीतील काळातच एक मोठी घटना घडलेली आहे, लोकशाहीच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने एक मोठी सुरूवात झालेली आहे.आपण ह्या बदलाचे साक्षीदार आहोत.

ती गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठा समोरील कामकाजाचे थेट प्रक्षेपण… *लाइव्ह स्ट्रीमिंग*

ज्यासाठी गेली चार वर्षे इंदिरा जयसिंग मॅडम यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयीन लढा लढला गेला आणि त्याला यश मिळाले.
योगायोगाने नवरात्र उत्सवाच्या काळात म्हणजे २७ सप्टेंबर पासून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचे कामकाज देशभरातील जनसामान्य बघू शकत आहेत.
ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही, ही भारतीय न्यायालयीन इतिहासातील महत्त्वाची घटना आहे.
काल महाराष्ट्रातील राजकीय तमाशा संदर्भातील खटल्याचे थेट प्रक्षेपण जनतेनं पाहिलं अनुभवलं…या पुढेही ते शक्य होणार आहे.

कारण एका दुर्गेने यासाठी लढा दिला आहे….खरी रणरागिणी कोण हे जर आज देशातील उमलत्या वयातील कन्यांना दाखवायचे असेल तर *ज्येष्ठ विधीज्ञ इंदिरा जयसिंग* यांचाच आदर्श समोर ठेवावा लागेल.
🙏🙏🙏🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − five =