You are currently viewing मालवण तालुका कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न

मालवण तालुका कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न

 

महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) “आंबा व काजू पीक “सन २०२२-२३ अंतर्गत, मालवण तालुक्यातील निश्चित फ्लॉटधारक शेतकऱ्यांसाठी उपविभागस्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा दि. २७ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सभागृह, पोईप येथे संपन्न झाली.

या कार्यशाळेस श्री. पी. बी. ओहोळ (उपविभागीय कृषी अधिकारी, कणकवली), प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील कीटकशास्त्रज्ञ व हॉर्टसॅप प्रकल्प अन्वेषक डॉ. विजयकुमार देसाई, डॉ.गोपाळ गोळवणकर (संशोधन सहयोगी हॉर्टसॅप प्रकल्प), आंबा संशोधन केंद्र, रामेश्वर गिर्ये, देवगड येथील उद्यानवेत्ता डॉ. विजय दामोदर, मालवण तालुका कृषी अधिकारी श्री. व्ही. जी. गोसावी, पोईप गावचे सरपंच श्री. संदीप सावंत, श्री. निलेश गोसावी सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा प्रकल्प, धनंजय गावडे कृषी पर्यवेक्षक व श्री.धनंजय गावडे कृषी पर्यवेक्षक, श्री. पवन सौंगडे कृषि सहाय्यक हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री. पी. बी. ओहोळ यांनी या कार्यशाळेचा उद्देश व महत्त्व तसेच पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आणि कृषी विभागाच्या इतर योजना यांची विस्तृत माहिती आपल्या प्रस्तावनेतून दिली. या कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात आंबा संशोधन केंद्र, रामेश्वर गिर्ये, देवगड येथील उद्यानवेत्ता डॉ. विजय दामोदर यांनी शेतकऱ्यांना जुनाट आंबा बागा व उत्पादन घेण्यासाठी त्याच्यावर होणारा खर्च टाळण्याकरिता त्या बागांचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता यावर विस्तृत मार्गदर्शन केले. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार देसाई यांनी काजू पिकावरील किडी- रोगांची ओळख व नियंत्रण आणि आंबा पिकावरील रोगांची ओळख व नियंत्रण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. गोपाळ गोळवणकर यांनी आंबा पिकावरील महत्त्वाच्या व दुय्यम किडींची ओळख व नियंत्रण या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेला अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या भेडसावणाऱ्या समस्या व प्रश्न विचारून त्यावर सखोल चर्चा केली. सदर कार्यशाळेत एकूण ६५ शेतकरी व कृषी विभागाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पवन सौंगडे व आभार प्रदर्शन श्री. धनंजय गावडे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा