नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा कहर सध्या कमी होत असल्याचे चित्र असले, तरी हा चिंतेचा विषय बनलेला आहे. देशात रुग्णांची संख्या ७१ लाखांवर पोहोचली आहे, तर एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर केला जातो. तसेच वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी पीपीई किटचा वापर करतात. त्यामुळे देशात गेल्या ४ महिन्यांत तब्बल १८ हजार टन कोरोना जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला आहे. त्यातील सर्वाधिक कचरा महाराष्ट्रातील असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून समोर आले आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार जूनपासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १८ हजार ०६ टन कोरोनाशी संबंधित जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला आहे. या कच-याची १९८ सामान्य जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया सुविधा युनिटद्वारे विल्हेवाट लावली जात आहे. विशेष म्हणजे एकट्या सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ५५०० टन कोरोना जैववैद्यकीय कचरा तयार झाला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या कच-याची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू असले तरी हा जैववैद्यकीय कचरा असल्याने याची विल्हेवाट लावतानादेखील विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे हा एक चिंतेचा विषय बनला आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. मात्र, आता तुलनेने नव्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे सध्या दिलासा मिळाला असला, तरी देशातील चार राज्यांनी चिंतेत भर टकाली आहे. कारण या राज्यांमध्ये कोरोनाचा वेग वाढला असून, रुग्णांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. त्यामध्ये कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. केरळ आणि कर्नाटकात हे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे देशभरात अजूनही कोरोनाची चिंता कायम आहे. त्यातच देशात विविध ठिकाणी अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करताना त्याचा संसर्ग होणार नाही, याची काळजी कोरोना योध्दांना घ्यावी लागत आहे. त्यामुळे मास्क, पीपीई किट यासह वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणा-या सर्व साधनांचा जपून काळजीपूर्वक वापर करावा लागत आहे. यातून कोरोनाशी संबंधित जैववैद्यकीय कच-याचे ढिग लागत आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक कचरा
कोरोना महामारीत देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना संकट चिंतेचा विषय आहे. त्यातच महाराष्ट्रातच सर्वाधिक जैववैद्यकीय कचरा असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्रात तब्बल ३ हजार ५८७ टन जैववैद्यकीय कचरा आहे. जूनपासून चार महिन्यांत सर्वाधिक जैववैद्यकीय कचरा महाराष्ट्रात निर्माण झाला आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
कच-याची राज्यनिहाय आकडेवारी
कोरोनाच्या संकट काळात जूनपासून चार महिन्यांत देशात मोठ्या प्रमाणात जैववैद्यकीय कचरा साठला आहे. राज्यनिहाय याचे प्रमाणही (टनांमध्ये) अहवालातून जारी करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात सर्वाधिक ३ हजार ५८७ टन, तामिळनाडूत १ हजार ७३७, गुजरातमध्ये १ हजार ६३८ टन, केरळमध्ये १ हजार ५१६, उत्तर प्रदेशात १ हजार ४१६, दिल्लीत १ हजार ४००, कर्नाटकात १ हजार ३८०, पश्चिम बंगालमध्ये १ हजार टन कचरा निर्माण झाला आहे.