पालिकेच्या बैठकीत निर्णय; पहील्या टप्प्यात शाळेच्या परिसरातील शंभर कुत्र्यांवर होणार प्रक्रिया…
सावंतवाडी
येथील पालिकेच्या माध्यमातून पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाल ग्रूपच्या माध्यमातून कुत्र्यांची नसबंदीचा मोहीम राबविण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्यात शाळांच्या परिसरातील शंभर कुत्र्यांवर ही प्रकिया करण्यात येणार आहे,असा निर्णय आज येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान,या मोहिमेनंतर पुढची प्रकिया ही अन्य कुत्र्यांसाठी असणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी दिपक केसरकर उपलब्ध करून देतील,असा विश्वास यावेळी जेष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी व्यक्त केला.त्याच बरोबर शहरातील कुत्र्यांना रेबीजचे इंजेक्शन देण्यात येणार आहे.मात्र,याबाबत या बैठकीत एकमत झाले नाही.जेष्ठ नगरसेविका लोबो यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या कार्यालयात ही बैठक झाली.
यावेळी पान संस्थेच्या प्रमुख निधी सावंत, माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर,सुरेद्र बांदेकर,शुभांगी सुकी,दिपाली सावंत,रवी जाधव,निता कविटकर,तसेच पालिकेचेे आरोग्य कर्मचारी वैभव नाटेकर,रसिका नाडकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित माजी पदाधिकार्यांनी पाल संस्थेच्या प्रमुख निधी सावंत यांच्याशी चर्चा केली. शहरात भटक्या कुत्र्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्याकडुन होणार्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यातील अन्य पालिका प्रमाणे सावंतवाडी पालिकेकडुन हा निर्णय घेण्यात यावा. त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांनी दिले.
दरम्यान, ही मोहीम राबविण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू त्यासाठी आवश्यक तो निर्णय घेण्यात यावा. शंभर कुत्र्यांवर आम्ही आमच्या संस्थेंच्या माध्यमातून प्रकीया करू,असे त्या म्हणाल्या.
यावेळी पहील्या टप्प्यात शाळांच्या परिसरातील कुत्र्यांवर ही प्रकीया राबविण्यात येईल आणि त्यानंतर पुढच्या काळात निधी मिळाल्यानंतर पुढील प्रकीया होईल. असा निर्णय घेण्यात आला यावेळी कुत्र्यांना रेबीजचे इजेक्शन देण्यावर चर्चा झाली. मात्र दोन्ही डोस एकत्र दिल्यास कुत्रे अधिक आक्रमक होवून हल्ले करू शकतात. त्यामुळे रेबीज इजेक्शन देण्याबाबत एकमत झाले नाही. त्यामुळे हा निर्णय काही दिवसानंतर घेवू असे यावेळी ठरविण्यात आले.