दीपक केसरकरांची रिफायनरी विरोधकांना हाक; खासदार विनायक राऊत यांच्यासह ठाकरे कुटुंबीयांवर टिका…
सावंतवाडी
वेंदाता राज्याबाहेर गेली म्हणून आकाश फाटल्यासारखे रान उठविणार्या विरोधकांनी रत्नागिरीच्या ३ लाख कोटीच्या प्रकल्पाचे समर्थन करावे, त्यासाठी आम्ही एकत्र बसण्यास तयार आहोत. हा प्रकल्प झाल्यास २ लाखाहून अधिक नोकर्या या ठिकाणी मिळतील. त्यामुळे विरोधासाठी विरोध नको, असे आवाहन करीत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, अशी हाक दिली. दरम्यान एक राऊत आतमध्ये गेल्यानंतर आता दुसरे राऊत बोलणार, अशी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर टिका करीत जे मंत्री असताना कधी मंत्रालयात गेले नाही ते आता गल्लीबोळात फिरुन सत्ताधार्यांवर खालच्या दर्जाची टिका करीत आहे, अशी ठाकरेंवर टिका केली.
श्री. केसरकर यांनी आज शहरातील विविध कामांचे भूमिुपजन केले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी दिड लाखाहून अधिक लोकांना रोजगार देणारा प्रकल्प गुजरातला नेण्यात आला. याबाबत श्री. केसरकर यांना छेडले असता ते म्हणाले, या ठिकाणी वेंदाता प्रकल्प गुजरातला नेणे हे संबधित कंपनीच्या मालकांचे मत आहे. त्यांना या ठिकाणी प्रकल्प सुरू करणे शक्य वाटत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असेल. मात्र त्याचे राजकारण करणे चुकीचे आहे, असे राजकारण करण्यापेक्षा रत्नागिरी येथे होणारा प्रकल्प मोठ्या प्रमाणात रोजगार देणारा आहे. त्याला विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा त्याचे समर्थन करा. फक्त पर्यावरणाच्या नावावर कोणी राजकारण करू नका, अशा प्रकारच्या प्रकल्पांना विरोध करण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते चुकीचे आहे. याबाबत आता लोकचं त्यांना योग्य ते उत्तर देतील, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी अप्रत्यक्षरीत्या माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टिका केली. ते म्हणाले, मागच्या काळात म्हणावे तसे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी विकासकामे केली नाहीत. याचा फटका विकासाला सहन करावा लागला. मात्र ते आता आमच्यावर टिका करीत सुटले आहे. जे आपण मंत्री असताना कधी मंत्रालयात गेले नाहीत त्यांना आता गल्लीबोळात फिरावे लागत आहे. आज ते आमच्यावर खालच्या पातळीवर जावून टिका करीत आहेत. मात्र आता आम्ही त्यांच्यावर बोलणार.