नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष यांच्याकडून रस्त्याची पाहणी
कणकवली
नगरपंचायत च्या सत्ताधाऱ्यांकडून अनेक नवनवीन रस्ते अस्तित्वात आणण्याचा संकल्प व तो संकल्प सत्यात उतरवण्याचा धडाका सुरू असताना आता कणकवली शहरात अजून एक नवीन रस्ता अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. कणकवली शहरातील प्रांत कार्यालयाकडून ऍड. उमेश सावंत यांच्या घरा लगत ते प्रांत कार्यालयाच्या मागील बाजूस कॉलेज रोडला काणेकर हॉटेल पर्यत जोडणारा एक नवीन रस्ता अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने कणकवली नगरपंचायत चे नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्याकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नुकतीच श्री. नलावडे व हर्णे यांनी नगरपंचायत कर्मचाऱ्यांसह संयुक्त पाहणी देखील केली. 9 मीटर रुंदी व सुमारे ७० मीटर लांबी अशा स्वरूपाचा हा रस्ता असणार असून, या रस्त्यामुळे सध्याच्या तहसीलदार कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वळून कॉलेज रोडला जाण्याचा मार्ग थेट सुरू होणार आहे. मात्र यात महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असलेली प्रांताधिकारी कार्यालयाची काही जमीन व प्रांताधिकारी कार्यालयाची शेड, स्वच्छतागृह, तसेच पाण्याची टाकी काढण्याची गरज असल्याचे प्राथमिक सर्वे मध्ये समोर आले आहे. तर ऍड. उमेश सावंत यांची देखील काही जमीन या रस्त्यासाठी जाणार आहे. मात्र हा रस्ता नव्याने झाल्यास कणकवली तहसीलदार कार्यालय प्रवेशद्वाराकडून प्रांत कार्यालयाच्या मागाहून कॉलेज रोडला जावे लागत असणारा वळसा कमी होऊन कणकवली प्रांत कार्यालयाच्या गडग्याकडून ते ऍड. उमेश सावंत यांच्या घराकडून ते थेट कॉलेज रोडला काणेकर हॉटेल पर्यत हा रस्ता जोडला गेल्यास हा वळसा कमी होऊन एक नवीन रस्ता कणकवली शहर वासियांना वाहतुकीस उपलब्ध होणार आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी या रस्त्याच्या अनुषंगाने प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. ज्यावेळी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडून प्रांताधिकारी कार्यालयाकडील जमिनी संदर्भात निर्णय होऊन या संदर्भात आवश्यक त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर या रस्त्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच ही मंजुरी मिळाल्यावर तातडीने नगरपंचायत कडून या रस्त्या करिता लागणाऱ्या निधीचे अंदाजपत्रक तयार करून त्यानुसार निधी देखील तात्काळ मंजूर करून घेतला जाईल अशी माहिती श्री नलावडे यांनी दिली. सध्या प्रांताधिकारी कार्यालयाच्या गेट कडून तहसीलदार कार्यालयाच्या दिशेने जाणारा रस्ता हा महसूल विभागाच्या जागेतून आहे. जर नवीन 9 मीटर रुंदीचा व 70 मीटर लांबीचा रस्ता अस्तित्वात आला तर प्रांताधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस असलेला रस्ता व तहसीलदार कार्यालयाच्या गडग्या पर्यत ची जमीन ही प्रांताधिकारी कार्यालयाला वापरण्यास उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रांताधिकारी कार्यालयाची जी रस्त्याला जाणारी जमीन आहे त्याऐवजी ही मागील जमीन हा मागील रस्ता बंद केल्यास वापरण्यास मिळू शकते. मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान कणकवली नगरपंचायत कडून या रस्त्या करिता सकारात्मक भूमिका घेण्यात आल्यानंतर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यासंदर्भात कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्याशी देखील चर्चा केल्याचे सांगण्यात आले. त्या चर्चेनुसार तहसीलदार देखील या रस्त्या करिता सकारात्मक असल्याची माहिती श्री नलावडे यांनी दिली. मात्र याबाबत लवकरच प्रांताधिकार्यांशी चर्चा करून प्रत्यक्ष रस्त्या करिता जमीन घेण्यास परवानगी बाबत अधिकृत पत्र व्यवहार करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे श्री नलावडे यांनी सांगितले. व त्यानंतर लगेचच आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून तात्काळ या रस्त्या करिता तसेच प्रांताधिकारी कार्यालयाची पाण्याची टाकी, स्वच्छतागृह करिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे श्री नलावडे यांनी सांगितले. यामुळे हा रस्ता अस्तित्वात आला तर आताच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात नवीन रस्ते अस्तित्वात आणण्याचा देखील कणकवली शहरात एक इतिहास घडणार आहे.