देवगड :
शिवसेना देवगड माजी तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेत शिंदे गटात सामील झाले. मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे.
विलास साळसकर यांनी शिंदे गटात आज उघडपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ उद्योगमंत्री उदय सामंत भेट घेतल्याने जिल्ह्यात शिवसेनेला धक्का मानला जात आहे. निष्ठावंत शिवसैनिक विलास साळसकर त्याची ओळख होती. शिवसेनेच्या पडत्या काळामध्ये त्यांनी पक्षाचे काम केले.
देवगड नगरपंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यात विलास साळसकर यांचा मोठा वाटा होता. त्यांनी मुंबईमध्ये उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाला साथ दिली. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिंदे गटाचे नेते ब्रिगेडियर माजी खासदार सुधीर सावंत, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, बाळू पारकर आदी उपस्थित होते.
यावेळी विलास साळसकर यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार देवगड तालुक्यातून २३० प्रतिज्ञापत्र केली. ३१ जुलै २०२२ रोजी शिवसेना भवन मध्ये ही प्रतिज्ञापत्र पोच केली. पक्षासाठी निष्ठेने काम करून देखील ६ ऑगस्ट रोजी माझ्या जागेवर दुसरा तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे प्रामाणिक काम करून देखील माझ्यावरती अन्याय का? असा सवाल विलास साळसकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या अन्यायाच्या विरोधात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्योग मंत्री उदय सामंत यांना साथ दिली आहे. मी विकास कामे व्हावी, या साठी भांडत असताना मला कानफाटके असे म्हणत माझ्यावर विविध आरोप करण्यात आले. मात्र हे आरोप सिद्ध करू शकले नाहीत. मी कुणाचे पैसे घेतले हे आरोप करणाऱ्यांनी पैसे देणाऱ्याला समोर घेऊन सिद्ध करून दाखवावा,असे खुले आव्हान विलास साळसकर यांनी दिले आहे.
२००७ पासून मी नारायण राणे यांच्या विरोधात देवगडमध्ये शिवसेनेमधून ठाम राहिलो. या काळात कोणीही पदाधिकारी शिवसेना सोडून गेलेला नाही. असे असताना देखील मला पक्षीय ताकद देण्या ऐवजी माझं खच्चीकरण करण्याचं काम वरिष्ठांनी केल्याच्या आरोप श्री. साळसकर यांनी केला. देवगड नगरपंचायत निवडून येण्यासाठी तीन महिने आम्ही मेहनत घेतली. मात्र,नको त्या नेत्यांनी चमकेशगिरी केली, असा आरोप शिवसेना नेत्यांवर विलास साळसकर यांनी केला.