*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी सुभाष मंडले यांचा अप्रतिम लेख*
*उंबराचे फुल- संस्कारमुर्ती श्री. एस.बी. पाटील सर*
सुख हे एखाद्या वार्यासारखे फुंकर मारून मनाला सुखाचा ओलावा देते, तर दु:खाचे वारे हे उन्हाळ्यातल्या गरम वार्यासारखे चटके देऊन जाते. आयुष्यात आलेली सुख दु:खं ही झोपाळ्यासारखी कधी मागे, तर कधी त्याच वेगाने पुढेही निघून जातात. मात्र अशा दोन्ही वेळेस मनाला कसे सावरावे, हे सांगणारे क्षण कधीच विसरता येत नाहीत.
त्यापैकीच एक २००५ सालीची ही गोष्ट…
सायन्सला अॅडमिशन घेतल्यानंतर सुरवातीला केमिस्ट्री विषयातील रासायनिक संयुगे, त्यांची रेणू सुत्रे पाहीली की वाटायचं लॅबमधील अनेक रसायनांची डोक्यात नुस्ती घुसळणच सुरू होईल की काय… पण शरीराने उंच, धडधाकट, ऐन पस्तीसीत अभिनेत्यासारखे दिसणारे पाटील सर यांनी वर्गात पाऊल टाकले, की एक खांदा किंचितसा उडवून हसतमुख चेहऱ्याने सर्वांवर नजर फिरवायचे आणि नंतर शिकवायला सुरुवात करायचे. केमिस्ट्रीतील प्रत्येक मुद्दा जसं विनोदी किस्सा सांगितला जातो तसं ते सांगायचे. यामुळे केमिस्ट्री विषयासह सरांची आणि विद्यार्थ्यांची चांगलीच केमिस्ट्री जुळलेली. त्यामुळे शिकत असताना कधी कोणाच्या डोक्यात रंगीत, गुलाबी दुनियेचा ‘केमिकल लोच्या’ होण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.
बारावीत असताना एके दिवशी, वर्गात त्यांनी ‘तुला शिक्षण घेऊन पुढे काय व्हायचे आहे?’, हे प्रत्येक विद्यार्थ्याला विचारले होते. काहींनी ठरवून, तर काहींनी पुढचा काय सांगतोय ते ऐकून, कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर अशी वेगवेगळी उत्तरे दिली. अनेकांच्या निरनिराळ्या उत्तरांवर सर्व जण हसायचे.(मी सुद्धा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जसे नाव कमावले, तसं ‘मी सुभाषचंद्र होईन’,असे सांगितले होते. हे असं वेगळंच उत्तर ऐकून अजूनच सगळे हसायला लागलेले.)
सायन्सच्या वर्गात आम्ही जवळपास साठ एक विद्यार्थी असेन. त्या सर्व विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव ,गाव यांची सर्व माहिती पाटील सर यांना माहीत होती. इतकंच नव्हे, तर आम्हाला सायन्सला केमिस्ट्री विषय शिकवणारे पाटील सर अकरावी-बारावी आर्ट, कॉमर्सच्या वर्गातील सुद्धा तीन साडेतीनशे मुला-मुलींना त्यांच्या नाव, आडनावावरून ओळखत होते. यावरून त्यांचा प्रत्येक विद्यार्थ्यांप्रती असणारा ऋणानुबंध लक्षात येईल…
पाटील सर कधी कुणाला रागाने बोललेत किंवा ओरडलेत, असं सहसा कधी मी बघितलं नाही. पण योग्य वेळी समोरच्याला बरोबर लागतील अशा ‘शब्दांच्या कोपरखळ्या’ मात्र ते हसत हसत देत असत. वर्गात प्रश्नोत्तराच्या तासाला त्यांच्या हातात अंगठ्याच्या जाडीची, हातभर लांबीची छडी असायची. उत्तर चुकले तरी चालेल, पण प्रत्येकाला बोलतं करायचे आणि उत्तरच न देणाऱ्याला मात्र प्रसाद घ्यावा लागायचा. त्यांच्या तासाला खेळीमेळीच्या वातावरणामुळे त्यांनी छडी मारलेल्याचे विद्यार्थ्यांना एवढे विशेष काही वाटत नसायचे.
त्यांच्या हातातली नुसती छडी जरी बघितली, तरी आमच्या डोक्यातली कॉलेजची सारी हवा निघून जायची. वाटायचं ‘आम्ही कॉलेजमध्ये नसून, अजून हायस्कूलमध्येच आहोत!’
दुपारी बारा वाजता कॉलेज सुटायचे. त्यानंतर पाच वाजेपर्यंत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तीन विषयांची प्रॅक्टिकल्स असायचे.
बारावीच्या परीक्षेत सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झाले पाहिजेत, यासाठी लॅबमध्ये प्रॅक्टिकल नसेल त्या दिवशी सुद्धा सगळ्यांना दुपारी बारानंतर संध्याकाळी किमान पाच वाजेपर्यंत सक्तीने अभ्यास करत बसायला सांगितले गेले होते.
सर्व जण एकाच ठिकाणी बसल्यामुळे अभ्यास कमी, गप्पाच जास्त रंगत होत्या, त्यामुळे कॉलेजच्या तीन मजली इमारतीत सर्वांना सुट्टे सुट्टे बसून अभ्यास करायला लावले होते.
आमचं बारावीचे महत्वाचे वर्ष चालू असूनही, आम्ही दुपारनंतर कॉलेज बाहेरच्या शेताजवळ एका मैदानावर क्रिकेट खेळत असायचो. शिक्षकांच्या सक्तीमुळे आमच्या क्रिकेट खेळण्यावर मर्यादा आलेल्या. यामुळे अनेकांची बांधून ठेवल्यासारखी अवस्था झाली होती.
क्रिकेट खेळण्याच्या वेडामुळे दोघा तिघांनी यावरही शक्कल लढवली. कॉलेज इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एक सभागृह आहे. तिथे काही कार्यक्रम असेल तरच बसण्याची व्यवस्था करून तो खूला केला जात असे. बाकी वेळी तो हॉल पुर्ण मोकळा व बंद असायचा.
एकाने जुन्या मोडलेल्या बेंचचे बॅटच्या आकाराचे फाळकूट व बॉल घेतला व पाच सहा जणांसोबत त्या हॉलमध्ये पोहचलो. बॉलने बाजूच्या स्लायडींग खिडक्यांच्या काचा फुटतील, हे लक्षात आल्यावर रबरी बॉल ऐवजी खोडरबर चा बॉल म्हणून उपयोग केला.
एक टप्पा आऊट नियमानुसार खेळात रंगत येत होती. किरण कांबळे, निलेश सावंत, उद्धव महाडिक, संदिप शिंदे, अभिजित बाबर, मिलिंद आंबवडे, महेश सावंत, गणेश महाडिक…इ. आणि मी. असे सात आठ जण सलग दोन तीन दिवस क्रिकेट खेळत होतो. रोज दुपारी बारा नंतर आम्ही कुठे गायब होतोय हे कुणालाच माहीत नसायचे.
एके दिवशी, नेहमीप्रमाणे हॉलमध्ये दरवाजा, खिडक्या बंद करून आम्ही क्रिकेट खेळू लागलेलो, तितक्यात बाहेरून कुणीतरी दरवाजावर थाप मारत आवाज देऊ लागलं. आवाजावरून अभिजित शिंदे आहे असे जाणवत होते. ‘मी पण तुमच्यासोबत खेळायला आलोय. मला आत घ्या’ म्हणून तो बाहेरून विनंत्या करत होता, पण आदल्या दिवशी आम्ही त्याला ‘खेळायला चल’ म्हणून आग्रह केला होता, तरीही तो आला नाही. त्यामुळे त्याला आत घ्यायचाच नाही, असे म्हणत त्याला तरसवण्यासाठी आम्ही दरवाजा उघडलाच नाही.
खेळताना दंगामस्ती, आवाजाने हॉल नुसता दणाणून गेला होता. दरवाजा, खिडक्या बंद असल्याने आमचा आवाज बाहेर, खालच्या मजल्यावर जात नाही, याची दोन दिवसांपूर्वी आम्ही खात्री करून घेतली होती. सगळे बिनधास्त, मजामस्ती करत क्रिकेट खेळण्यात दंग होतो.
काही वेळाने अजून जोरजोरात दरवाजा थपथपाटत ,”अरे खेळायचं बंद करून लवकर बाहेर या. दरवाजा उघडा. सर इकडेच यायला लागले आहेत.” असा अभिजितने आवाज दिला. आपली क्रिकेट खेळायची हौस अजूनही पूर्ण होऊ शकते, या आशेने तो सरांचा धाक दाखवून, दरवाजा उघडण्यासाठी खोटं बोलत असेल व दरवाजा वाजवत असेल म्हणून आम्ही कुणीही तिकडे लक्ष न देता आम्ही आमच्या क्रिकेटच्या खेळात गुंग झालो.
काही वेळानंतर दाराच्या फटीतून मोठ्याने वेगळ्याच आवाजात दोघा तिघांची नावे घेतलेल्याचा कानावर हलकासा आवाज आला, तसं सगळे जागच्या जागी स्तब्ध, शांत झाले. आवाज खूपच ओळखीचा होता. कुणीतरी हातातली लाकडी फळी घाई गडबडीत कुठेतरी लपवली आणि सर्वजण बंद दरवाजाजवळ गेलो.
दरवाजा उघडायला पुढे कोणीही धजावेना. प्रत्येक जण एकमेकांच्या आडोश्याला दडत होता. पुढे कोणी व्हायचं हा गहन प्रश्न निर्माण झालेला. तितक्यात पुन्हा, ‘किरण दरवाजा उघड’ ,असा
बाहेरून आवाज आला. तसं नाईलाजास्तव किरण पुढे झाला. उघडू का नको, उघडू का नको करत दाराची कडी काढली अन्
हळूहळू दरवाजा उघडला.
तसं समोर हातात काठी, अन् गंभीर चेहरा करून पाटील सर उभे…!!!
सरांना अशा अवतारात समोर पाहिलं आणि अंधारात चाचपडत चालत असताना अचानक आलेल्या लाईटच्या प्रखर उजेडाने डोळे दिपून जावेत, अन् पुढचं काही दिसायचंच बंद व्हावं, अशी माझी अवस्था झालेली.
महाभारतातील संजय हा आपल्या दिव्य दृष्टीने कुरूक्षेत्रावर घडत असलेल्या युद्धाचा ‘आँखो देखा हाल’ जसं आंधळ्या धृतराष्ट्रला सांगत होता, अगदी तसंच काहीसं त्यावेळी झालं असावं व वरच्या मजल्यावर असलेल्या सभागृहामध्ये आम्ही क्रिकेट खेळतोय, हे त्यांना समजलं असावं.
त्यांच्या हातातली काठी बघून काळजात धस्स् झालं. त्यांचा आम्ही सर्वच जण आदर करत होतो. त्यामुळे त्यांच्या नजरेला नजर द्यायचे आमच्यापैकी कुणाचेच धाडस होत नव्हते. पाटील सर आत आले. आतून दरवाजा लाऊन घेतला आणि कडी लाऊन घेतली. आता मात्र ते एकेकाला फोडून काढल्याशिवाय राहणार नाहीत. भितीने हृदयाचे ठोके वाढायला लागलेले. माराची भिती होतीच, पण आम्ही त्यांच्या नजरेत गुणी विद्यार्थी होतो. त्यांनी आमच्यावर गुणवंतपणाची पांघरलेली झालर त्यांच्याकडूनच अशी उतरवली जाणार. याची मनाला बोचणी लागलेली. मनात नुस्ती कालवाकालव सुरू झालेली.
पाटील सर काही बोलायच्या आत किरण आतून घाबरून गेलेला, तरीही तोंडावर उसने हसु आणत बोलला, ” सॉरी सर, चुक झाली. पुन्हा असे नाही करणार. एवढ्या वेळी माफ करा.” त्याच्या सुरात सूर मिसळून आम्हीही तोंडावर उसने हसु आणत सॉरी सर, सॉरी सर म्हणू लागलो.
” हॉलमध्ये क्रिकेट खेळत होतात, तेही तुम्हाला अभ्यास करत बसायला सांगितलेल्या वेळेत.. अभ्यासाचे कुणालाच गांभीर्य नाही. ही तुम्हा सर्वांना चुक मान्य आहे. चुक केली आहे तर शिक्षा ही मिळायलाच पाहिजे.” एकेकाकडे पाहत, “काय संदिप? निलेश? महेश? उद्धव?…? सुभाष? (इतर वेळी प्रेमाने, गंमतशीरपणे ‘सुभाषलाला’ या नावाने संबोधणारे पाटील सर, आज यावेळी फक्त ‘सुभाष’ या एकेरी नावानेच बोलत होते. फक्त या एकेरी नामोल्लेखानेच मीच माझ्या नजरेत अक्षरशः संपून गेलो. पाण्यात ढेकळ विरघळावा तसा विरघळून गेलो.)
काय किरण बरोबर ना? ”
आम्ही सगळे अपराधीपणाच्या भावनेने माना खाली घालून निशब्दपणे उभे.
“घे. हात पुढे घे.”, असे म्हणत त्यांनी छडी मारायला वर उचलली.
सर्वांत पुढे किरण होता, त्यामुळे सहाजिकच त्याने घाबरत घाबरत हात समोर केला. छडी जोरात उगारलेली बघून त्याने खसकन हात मागे घेतला. पुन्हा एकदा घाबरत घाबरत हळूहळू हात पुढे केला आणि डोळे गच्च मिटून घेतले.
तो क्षण, ती अवस्था बघून आम्हीही फुलांच्या पाकळ्या चुरगळतात तशी बोटं तळ हातावर चुरगाळत, हातावर फुंकर मारत छडीचा मार घ्यायला सज्ज होत होतो.
पण घडले वेगळेच अनपेक्षितपणे पाटील सर यांनी छडी मारताना हात मागे घेवू नये, यासाठी किरणच्या हाताची बोटे पकडून धरण्यासाठी स्वतःचा हात पुढे केल्यासारखे करून. किरणच्या हाताच्या वरच्या बाजूला हात केला व स्वतःच्याच तळ हातावर जोर जोराने छडी मारायला सुरुवात केली. आम्हाला समोर काय घडतंय हे कळायच्या आत सलग तीन चार छड्या मारून झाल्या होत्या. हाताला झिणझिण्या आल्याने त्यांनी हात खाली घेत दोन वेळ झिंजडला आणि पुन्हा हात वर घेऊन पुन्हा हातावर छडीचा मार घ्यायला सुरुवात केली. समोर उभा असलेल्या किरणचे खाडकन डोळे उघडले. किरण आणि अजून दोघा तिघांनी छडी अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा हात धुडकावून लावत पुन्हा जोरजोराने हातावर छडीचा मार देऊ लागले.
आमच्यातल्या एक-दोघांनी पुढे होऊन त्यांचा छडी लागलेला हात पकडला आणि भिजल्या डोळ्यांनी म्हणालो, ” सॉरी सर, सॉरी सर आमची चूक झाली, तुम्हाला असा त्रास करून घेऊ नका? आम्हाला शिक्षा करा.”
“शिक्षा व्हायलाच पाहिजे, तुम्हाला नव्हे, तर मला. तुम्ही तुमच्या बाजूने बरोबर असाल. तुमचं काहीच चुकलं नाही, माझीच चुक झाली. मीच माझ्या बाजूने तुम्हाला समजावण्यात कमी पडलोय. आम्ही तुम्हाला संस्कार द्यायला कमी पडलोय, त्यामुळे मला शिक्षा व्हायलाच पाहिजे.”
सरांची अशी भावनिक साद ऐकून काळजाला चिमटा बसला. मनात कालवाकालव झाली. कंठ दाटून आला. क्षणात आमच्या सर्वांचे डोळे पाण्याने डबडबले.
“सर दोन छड्यांच्या जागी चार मारा. आठ मारा. वाट्टेल तितके मारा. आम्हाला वाट्टेल ती शिक्षा करा, पण सर… आमच्यामुळे तुम्हाला असा त्रास करून घेऊ नकोसा. आम्ही आजपासून अजिबात क्रिकेट खेळणार नाही. फक्त अभ्यासच करणार. आमच्यामुळे तुम्हाला त्रास होईल, असे कधी आम्ही वागणार नाही.”, असे म्हणत आम्ही सर्वांनी सरांना हात जोडले आणि काळवंडलेल्या मनाने विनवण्या करत, ‘सॉरी सर, सॉरी सर’, म्हणू लागलो.
सरांनी ज्या हातावर छडीचा मार घेतला होता, त्या गोऱ्या हातावर काही क्षणातच छडीच्या माराने लाल निळसर रंगाचा जाड वळ उमटलेला. त्यावेळची ती दाहकता मनाला अजूनही सुन्न करणारी आहे.
आई आपल्या मुलाला शिक्षा करते व नंतर प्रेमाने आपल्या पोटाशी कवटाळून धरते. काहीसे असेच भाव त्यावेळी सरांच्या डोळ्यात तरळलेले पाणी पाहून मला वाटले.
त्या दिवशी त्यांनी छडीचा त्यांच्या हातावर नव्हे, तर आमच्या भरकटणाऱ्या मनावर वार केला. विद्यार्थी भावनिकदृष्ट्या शिक्षकांशी जोडले गेलेले असतात, पण शिक्षक सुद्धा तितक्याच भावनिकतेने विद्यार्थ्यांशी जोडलेले असतात. हे त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.
आदरणीय एस. बी. पाटील सर यांच्या सोबतच्या अशा अनेक आठवणी आहेत, की ज्यामुळे त्यांना संस्कार मुर्ती, उंबराचे फुल (अतिशय दुर्मिळ व्यक्ती) म्हणावंसं वाटतं. ते माझ्यासह प्रत्येकाला माझेच वाटतात.
ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण पूर्ण होऊन आज पंधरा-सोळा वर्षे झालीत, तरीही तेथे मिळालेल्या पुस्तकी शिक्षणाचा उपयोग पैशाच्या जगात किती होतोय, हे स्पष्टपणे सांगता येणार नाही, पण बिघडण्याच्या काळात आम्हाला घडवण्याचं काम मात्र पाटील सर आणि तेथील सर्व शिक्षकांनी केले; हे ठामपणे सांगता येईल.
आदरणीय रमजान एम. शिकलगार सर (physics),
संजय बी. पाटील सर (Chemistry),
शबनम मनेर मॅडम(English),
अंजली शिंदे मॅडम( Biology),
सुवर्णा पाटील मॅडम (Math’s)
विजय सातपुते सर (मराठी) यांनी शिक्षणासोबतच शहाणपणाची, संस्कारांची जी भक्कम शिदोरी दिली आहे. ती अजून भरून उरली आहे, असं मला वाटतं.
✍️_सुभाष आ. मंडले
(९९२३१२४२५१)
Advertisement
Web link
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*