You are currently viewing मानधन नको, वेतन द्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

मानधन नको, वेतन द्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

विविध मागण्यांचे प्रभारी सी ई ओ संजय कापडणीस यांना दिले निवेदन

ओरोस

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील तक्रार निवारण समितीच्या तिमाही सभा घ्याव्यात, मानधन नको वेतन द्या, किमान वेतन १८ हजार रूपये द्या, यासह विविध मागण्यांसाठी आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. तर आपल्या विविध मागण्यांचे निवेदन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांच्याकडे सादर केले.

अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अंगणवाड़ी कर्मचाऱ्यांनी आज ओरोस फाटा ते जिल्हा परिषद कार्यालय असा मोर्चा काढला. या मोर्चात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आम्हाला मानधन नको वेतन द्या, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सवलती द्या, किमान वेतन १८ हजार द्या, अशा घोषणा देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासन व शासनाचे लक्ष वेधले. यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेत्या कमलताई परुळेकर यांनी मोर्चाला संबोधित करताना शासनाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. कमी मानधनात अनेक उपक्रम राबवून घेतले जात आहेत. मात्र लाभ देताना वेळ काढून धोरण अवलंबले जात आहे.असा आरोप करत यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. तरी शासनाने वेळीच दखल घेऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा दिला. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांची भेट घेत त्यांच्याकडे सादर केले. यावेळी कमलताई परुळेकर ,शालिनी तारकर, रोहिणी लाड, शितल साळुंखे, शोभा सावंत, दिपाली पठाणी, कांचन शेनई, स्वाती पोचेकर ,गुलाब चव्हाण, आदी संघटनांच्या तालुका पदाधिकारी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 2 =