गोल्ड ट्रेडिंगच्या अक्षय योजनेतून केली फसवणूक.
कणकवली तालुक्यातील एक युवक मुंबईत कामानिमित्त होता. नोटबंदी नंतर त्याने गोल्ड ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू केला. काही महिन्यांपूर्वी तो आपल्या मूळ गावी आला आणि इथेही त्याने गोल्ड ट्रेडिंगचा धंदा सुरू केला. सिंधुदुर्गात आजपर्यंत कित्येक एमएलएम कंपन्या आल्या, कितीतरी स्कीम आल्या, लोकांनी त्यात बक्कळ पैशांच्या आशेने आपली कष्टाची कमाई गुंतवली, आणि प्रत्येकवेळी आपले जिल्हावासीय नाकावर आपटलेत.
कणकवली तालुक्यातील या सोन्याची अक्षय योजना आणणाऱ्या व्यक्तीने कुडाळ आणि कणकवली तालुक्यातील अनेकांना गंडा घातला आहे. गोल्ड ट्रेडिंगच्या त्याच्या व्यवसायात कुडाळ, कणकवलीतील अनेक लोकांनी लाखो रुपये गुंतवले आहेत. नोटबंदी नंतर लोकांना गुंतवणुकीसाठी पर्याय उपलब्ध करून देत त्याने हा व्यवसाय सुरू केला.
अक्षय योजनेच्या या गोल्ड ट्रेडिंगमध्ये कायदेशीर कागदपत्रे करून गुंतवणूक करणाऱ्यांना हा युवक गुंतवणुकीवर महिन्याला तीन वेळा व्याज देत होता. लोकांना आशा निर्माण झाल्यावर त्याने कोणतीही कायदेशीर कागदपत्रे न करणाऱ्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर आकर्षक अधिक व्याज देण्यास सुरुवात केली. सुरुवातीस त्याने अधिक व्याज दिलेही. अधिक व्याजाचे आमिष दाखवल्यामुळे अनेकांनी काहीही कागदपत्रे न करता पैसे गुंतविले.
लोकांनी गुंतविलेल्या पैशातून तो दुबईतून सोनं आणून तो विकत असायचा, व सोन्याच्या रोजच्या भावाप्रमाणे लोकांना व्याजही देत होता. अशी माहिती संवाद मिडिया पर्यंत पोचली. २०१२ पासून तो हा व्यवसाय करत होता, एखाद्याला काही प्रॉब्लेम वाटलाच आणि त्याने रक्कम परत मागितली तरीही तो देत असायचा. अशाप्रकारे त्याने लोकांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे काही लोकांनी तर कर्ज घेऊनही अधिक रक्कमेच्या आशेपोटी पैसे गुंतविले होते.
सोन्याची अक्षय योजना चालविणाऱ्या या युवकाने गेल्या तीन महिन्यांपासून लोकांना पैसे देण्याचे बंद केले आहे. गेल्या ८ ऑक्टोबर पासून तर त्याचा मोबाईल फोन सुद्धा बंद येत आहे. त्यामुळे गोल्ड ट्रेडिंगच्या नावावर पैसे गुंतविणाऱ्या सिंधुदुर्गातील मुख्यतः कणकवली कुडाळ मधील अनेकांना या अक्षय योजना आणणाऱ्या युवकांना चुना लावून लाखो रुपयांना गंडविले आहे. त्यामुळे कर्ज काढून, कोणी कष्टाचे जमविलेले पैसे अधिक पैशांच्या हव्यासापोटी गुंतविले ते डोक्याला हात लावून बसले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कधीही या आणि भोळ्या भाबड्या लोकांना फसवा अशीच परिस्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांनी नको त्या फंदात पडून आयुष्यभराची कमाई पाण्यात घालण्यापेक्षा सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने देखील अशा फसवाफसवीची दखल घेऊन फरार असणाऱ्या इसमावर कारवाई करावी. अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा वासीयांकडून होत आहे.