*संजू परब यांच्या भेटीमुळे शहरातील अवैद्य धंदे बंद होणार?*
सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडीचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या सोबत भाजप शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, महेश पांचाळ आदी सहकारी उपस्थित होते.
सावंतवाडी शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू झाला असून शहरात अनेक ठिकाणी मटक्याचे स्टॉल सुरू आहेत, त्यामुळे मटका व्यवसाय सर्वात तेजीत सुरू आहे. मटक्याच्या व्यवसायात अनेकजण मातब्बर झालेत परंतु सर्वसामान्य मात्र त्यात भरडला जात आहे. शहरातील नरेंद्र डोंगर परिसरात तर दरवर्षी ट्रक भरून दारूच्या बाटल्या सामाजिक कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक गोळा करतात. शहरातील वाड्या वाड्यातील आड रस्त्यावर अनेक ठिकाणी बाटल्यांचा खच दिसतो. त्यामुळे गोवा बनावटीच्या अवैद्य दारूचा व्यवसाय शहरात जोरात सुरू असून “मागणी तिथे पुरवठा” म्हणून शहरातील अनेक युवक अवैध दारूच्या व्यवसायात अडकत चालले आहेत, आणि दारूचा व्यवसाय करणारे मात्र हायफाय गाड्यांमधून एसीची हवा खात फिरत आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील परमिटरुम मधून गोवा बनावटीची भेसळयुक्त दारू राजसोसपणे विकली जात आहे. अशा परमिट रूमवर धाड पडली असता हे मालक नामानिराळे राहून नोकर बाहेरच्या बाहेर असे चोरीने विक्री करतात अशा थापा मारून नोकरांना अडकवून स्वतः मात्र सफेद कपड्यात वावरत आहेत. शहरात भुरट्या चोरांकडून घरफोडी सारख्या घटना घडत आहेत, त्यामुळे शहरात दिवसा फिरता व्यापार करणारे परप्रांतीय व्यावसायिक आदींवर देखील करडी नजर ठेवणे आवश्यक आहे.
सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब आणि सहकाऱ्यांनी नवनिर्वाचित पोलीस निरीक्षकांची सदिच्छा भेट घेतल्याने शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कुऱ्हाड कोसळणार याबाबत शंकाच नाही.