You are currently viewing नुकसान झालेल्या भातशेतीचे ताबडतोब पंचनामे करावेत….

नुकसान झालेल्या भातशेतीचे ताबडतोब पंचनामे करावेत….

मनसेतर्फे मालवण तहसीलदारांना निवेदन सादर

मालवण
नुकसान झालेल्या भातशेतीचे ताबडतोब पंचनामे करावेत, अशा आशयाचे निवेदन आज मालवण तहसीलदार यांना देण्यात आले
जुलै-ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थिती आणि भूस्खलने तसेच क्यार’ नावाच्या वादळी व अवकाळी पावसामुळे आणि आत्ता पुन्हा ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या वादळी व अवकाळी पावसामुळे मालवण तालुक्यातील सरासरी ७० टक्के भातशेती पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे,काही भागांत हि नुकसानी ९० टक्के पर्यंत पोहोचली आहे. येत्या दि.१५ नोव्हेंबर पर्यंत योग्य ते पंचनामे करून भरपाई द्यावी.

भाताच्या लोंब्या चिखलात आडव्या पडल्यामुळे शेतातच या धान्यास कोंब फुटले आहेत. शेतीच्या बंधाऱ्यांचे नुकसान झाले आहे. मालवबणातील काही गावात भात खाचरांमध्ये डोंगरांतील माती,झाड-झाडोरा वाहून आला आहे. कापणी झाली तरी भात सुकवायला जागा नाही अशी परिस्थिती आहे.पुढच्या वर्षी गुरांच्या वैरणीचा प्रश्न उद्भवणार आहे. यावर्षी आतापर्यंत मालवण तालुक्यात सरासरी ४००० ते ४५०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दिनांक १३ मे २०१५ च्या शासन निर्णयानुसार (महसूल व वनविभाग, सीएलएस-२०१५/प्र.क्र.४०/म -३) केंद्र शासनाच्या निकषाच्या धर्तीवर (SDRF/NDRF) नैसर्गिक आपत्तीबाधित व्यक्तींना सन २०१५ ते २०२० या दरम्यान २ हेक्टर मर्यादेपर्यंत जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्याची झालेली पिक नुकसानी ३३ टक्के किंवा ३३ टक्के पेक्षा अधिक असेल तरच नुकसान भरपाई (सरकारी भाषेत निविष्ठा अनुदान) दिले जाते. खरीप (भात) क्षेत्रासाठी जास्तीत जास्त (₹२७७८/एकर) एवढी तुटपुंजी आहे. म्हणजेच गुंठ्याला ₹७० मिळतील. एवढी तुटपुंजी मदत देऊन भात उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा करू नये.

भात पिक लागवडीस प्रत्यक्ष खर्च ₹ ७९२ प्रती गुंठा एवढा येतो. प्रती गुंठ्याला सरासरी ६२ किलो भात पिकते. १० किलो भातापासून सरासरी ६ किलो तांदूळ मिळतो. भाताचा सरकारी दर ₹ १८५० प्रती क्विटल आहे. उत्पादित केलेला माल बाजारात विकल्यास गुंठ्याला सरासरी ११४७ रुपये शेतकऱ्याला मिळतात. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई चे निकष तत्काळ बदलून सुधारित निकषाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आमची मागणी आहे.

यासाठी सरसकट पंचनामे करावेत. नुकसान भरपाईची रक्कम सरसकट लागवड क्षेत्रानुसार द्यावी. आवश्यकता वाटल्यास अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार पिक नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत.त्यासाठी ड्रोन्स,रिमोट सेन्सिंग सर्व्हे,व सॅटेलाइट सर्वे यांचा वापर करून जिल्ह्यातील भात पिकाची नुकसानी काही दिवसांत पूर्ण होऊ शकते.

तरी आमच्या या मागणीचा सहानुभूतीने विचार होवून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देवून आर्थिक हातभार शासनाकडून द्यावा अशी नम्रपणे विनंती या पत्राद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालवण तहसीलदारांना केली आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी, महिला शहरअध्यक्षा भारती वाघ, महिला उपतालुकाध्यक्षा राधिका गावडे, उदय गावडे, नंदकिशोर गावडे, उपशहरअध्यक्ष विशाल ओटवणेकर, मनविसे उपतालुकाध्यक्ष संकेत वाईरकर, मनविसे शहरअध्यक्ष साईराज चव्हाण, विजय गावडे, दिनेश कदम, सचिन गावडे, सुशील चव्हाण, दत्तराज चव्हाण, सिद्धेश मयेकर, रेकी फर्नांडिस आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − one =