You are currently viewing न्हावेली-नागझरवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान…

न्हावेली-नागझरवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान…

वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मदतकार्य; सुखरूप बाहेर काढत नैसर्गिक अधिवासात सोडले…

सावंतवाडी

न्हावेली-नागझरवाडी येथील शेतकरी रुपेश सावंत यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यास वनविभागाला यश आले. ही घटना आज सकाळी ९:०० वा. घडली. त्या बिबट्याला पिंज-याच्या सहाय्याने बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. याबाबतची माहिती सावंतवाडी वन विभागाचे अधिकार मदन क्षिरसागर यांनी दिली. दरम्यान तो बिबट्या कोंबडी किंवा भटक्या कुत्र्याच्या शिकारीसाठी त्या ठिकाणी आला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तर मोठ्या प्रमाणात पाऊस असताना सुद्धा बचाव पथकाने यशस्वीरीत्या त्याला जेरबंद केले.

याबाबत अधिक माहीती अशी की, संबंधित बिबटा हा अंदाजे अडीच ते तीन वर्षांचा वाढ झालेला नर असून त्याची वन्यजीव वैद्यकीय डॉक्टर यांचेकडून तपासणी करण्यात आली. सदर बिबटा हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी पूर्णतः निरोगी असलेचे या तपासणीमध्ये दिसून आले. त्यानुसार त्याला नैसर्गिक अधिवासात यशस्वीरित्या मुक्त करण्यात आले.

यावेळी बचावकार्यात न्हवेलीच्या गावकरी मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले. तर बचावकार्य मोहिमेत सावंतवाडी उपवनसंरक्षक दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सावंतवाडी मदन क्षीरसागर, वनक्षेत्रपाल कडावल अमित कटके, वनपाल महेश पाटील, वनरक्षक अप्पासो राठोड, दत्तात्रय शिंदे, महादेव गेजगे, संग्राम पाटील, सागर भोजने, प्रकाश रानगिरे, रामदास जंगले, राहुल मयेकर आदी सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा