*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री जयश्री जिवाजी कुलकर्णी लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*गणेशाला निरोप*
निघालात का बाप्पा तुम्ही स्वर्गामधल्या घरी आता
डोळ्यांमध्ये भरते पाणी निरोप तुम्हाला देता
दहा दिसांच्या सहवासाने लळा लागला छान किती
सकाळपासून आज परंतु आकुळ व्याकुळ मनस्थिती
उत्साहाला उधाण येता त्रास तुम्हा झाला का हो
कौतुक तुमचे केले आम्ही समजून आम्हाला घ्या हो
धावपळीतून काढत होतो वेळ जरा तुमच्यासाठी
आरती समयी घडत राहिल्या आप्तांच्या गाठीभेटी
प्रसाद आरती नैवेद्याची धूम आमच्या असे घरी
तुमच्यासाठी असे खिरापत रोज वेगळी काहीतरी
पल्ला तुमचा खूप लांबचा भूक लागता रस्त्यात
कुठे थांबुनी खाऊन घ्यावा शिदोरीतला दहीभात
जाता जाता माणसास या शिकवून जा ना चार धडे
स्वर्गामधल्या घरातून त्या लक्ष असू द्या आम्हाकडे
रस्त्यावरचे खड्डे टाळून उंदीर मामा नीट चला
पाऊस येतो वेळी अवेळी सांभाळून न्या गणपतीला
जयश्री जिवाजी कुलकर्णी
नाशिक