सिंधुदुर्गनगरी
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्लीचे कार्यकारी अधिकारी तथा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या हस्ते लोक अभिरक्षक उपक्रमांचे देशव्यापी उद्घाटन करण्यात आले. 22 राज्यांत 365 जिल्हा विधी सेवा प्राधिकरणअंतर्गत लोक अभिरक्षक अर्थात डिफेन्स कौन्सिल कार्यालय सुरु करण्याची घोषणा केली होती. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश असून, जिल्ह्यात लवकरच या कार्यालयाची सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.बी. म्हालटाकर यांनी दिली आहे.
या कार्यालयासाठी जिल्ह्यासाठी एक मुख्य लोक अभिरक्षक,सहायक लोक अभिरक्षक 3 यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे कार्यालय जिल्हा न्यायालयात उपलब्ध करुन दिलेल्या प्रशस्त दालनात सुरु होणार आहे. लोक अभिरक्षक कार्यालयात अत्याधुनिक कायदेविषयक माहिती पुरविणारे संगणक, प्रिंटर, स्टेशनरी यांचा पुरवठा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणामार्फत केला जाणार आहे. या कार्यालयात लिपिक व शिपाई देखील पुरविले जाणार आहेत. या पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2022 रोजी पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. गोरगरीबांना दर्जेदार विधी सेवा पुरविण्यासाठी या कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे.
तरी जास्तीत जास्त विधीज्ञांनी या पदाकरिता अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांचे कार्यालयात करावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.बी.म्हालटकर यांनी केले आहे.