You are currently viewing मळगांवातील माळीचे घरात सुमारे ७०० वर्षाहूनही अधिक काळ गणेशोत्सवाचे आतिषबाजीत विसर्जन

मळगांवातील माळीचे घरात सुमारे ७०० वर्षाहूनही अधिक काळ गणेशोत्सवाचे आतिषबाजीत विसर्जन

सावंतवाडी :

सावंतवाडीतील मळगांव येथील माळीचे घरात सुमारे सातशे वर्षाहूनही अधिक काळ गणेशोत्सवाची परंपरा ६५ पेक्षाही अधिक राऊळ कुटुंबांच्या सामूहिकतेतून जपली जात आहे. या परंपरे अंतर्गत यावर्षी ही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. मळगांव गावातील पाचवे देवस्थान म्हणून ओळख असलेल्या व मळगांवसह सावंतवाडी तालुक्याचे धार्मिक भूषण असलेल्या या गणरायाचे सालाबादप्रमाणे सातव्या दिवशी वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत विसर्जन पार पडले. हा गणेशोत्सव राऊळ कुटुंबियांच्या सामूहिक व कौटुंबिक एकतेचे आदर्श उदाहरण असून दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सवात गणपती पुजन, ऋषिपंचमी, गौरी पुजन व विसर्जन,सत्यनारायण महापूजा , भजने, फुगडी सहीत लहान व तरुण मुले-मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

सोनुर्ली या गावातील श्री देवी माऊलीसह मळगांव येथील श्री देव रवळनाथ, श्री देव भूतनाथ, श्री देव मायापूर्वचारी, श्री देव दोन पूर्वस या चार देवस्थानांसह गावातील पाचवे देवस्थान म्हणून ओळख असणारे माळीचे घर हे एकत्रित कुटूंबाच्या श्री गणरायाच्या सातशे वर्षांच्या परंपरेमुळे मळगांवसह सावंतवाडी तालुक्याचे धार्मिक भूषण म्हणून नावारूपास आले आहे.आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवामध्ये परंपरा आणि भावनेची सुरेख सांगड घालून कोकण संस्कृतीचे नाव सातासमुद्रापार नेण्याचे काम या घराण्यातील कुटूंबियांनी केले आहे. गणेशोत्सवाची क्रेझ मनाच्या गाभाऱ्यात समृद्ध धार्मिकतेने आणि भावपूर्ण श्रद्धेने जोपासली आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्याचे सुसंस्कृत आणि सुंदर ठिकाण म्हणून माळीचेघराची ओळख निर्माण झाली आहे. कोकणात सुंदरवाडी अशी ओळख असणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील मळगांव येथील माळीचे घरातील गणेशोत्सवाची परंपरा या संस्कृतीचीच प्रचिती आणून देणारी आहे. सुमारे सातशे वर्षाहूनही अधिक काळ माळीच्या घरात गणेशोत्सव ६५ कुटुंबांच्या सामूहिकतेतून साजरा केला जातो. या कुटुंबियांकडून करण्यात येणारी गणेशोत्सवाची पूर्वतयारी, गणेशाच्या कालावधीतील भक्तीमय कार्यक्रम हे प्राचीन भारतीय संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीच्या उत्तम उदाहरणाचा दाखला देणारी आहे. सोनुर्लीतील श्री देवी माऊलीसह मळगावातील श्री देव रवळनाथ, श्री देव भूतनाथ, श्री देव मायापूर्वचारी, श्री देव दोन पूर्वस या चार देवस्थानांसह ‘माळीचे घर’ मळगांव येथील पाचवे देवस्थान म्हणून नावारूपास आले आहे. वास्तविक हे पाचवे देवस्थान माळीच्या घरातील मानकऱ्यांनी, सर्व कुटुंबियांनी मनाच्या अंतर्भावाने जागृकतेने जोपासले आहे. सावंतवाडी शहराच्या पश्चिम सीमेला लागून असणारे मळगांव हे गाव येथील रेल्वे स्थानकामुळे देशाच्या नकाशावर रेखाटले गेले असून या गावात दहा वाड्यांचा समावेश असून लोकसंख्या सुमारे सहा हजाराच्या आसपास आहे. या पैकी माळीचे घर गावाच्या उत्तर दिशेला वसले असून या परिसरात राऊळ कुटुंबांची जवळपास 75 च्या आसपास एकत्रित कुटुंबाची लोकवस्ती आहे. या कुटुंबियांमधील प्रत्येक घरातील किमान निम्मे तरी कामानिमित्त पुणे-मुंबई येथे स्थायिक झाले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त विभागलेली ही भावंडे होळीपौर्णिमा, नागपंचमी, अष्टमी आणि गणेशोत्सव अशा चार उत्सवाला एकत्र येतात. या तिन्ही उत्सवांमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या गणेशोत्सवाची पूर्वतयारी या तिन्ही उत्सवातील दिवसांमध्ये राऊळ बांधवांकडून होत असते. विशेषतः गणेशाच्या तयारीसाठी आवश्यक सर्व गोष्टींची कसलीही घाई गडबड वा गोंधळ न करता अगदी नियोजनबद्धरीत्या तयारी केली जाते. गणेशोत्सव सण राऊळ कुटुंबातील जेष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली घरातील लहान मोठी मंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन अगदी पारंपारिक पद्धतीने साजरा करतात. गणेशोत्सवाच्या अगोदर येणाऱ्या पौर्णिमेला मूर्ती तयार करण्यासाठी शाडूची माती आणली जाते आणि मुख्य गणेश मुर्तीकार प्रभाकर बाबाजी राऊळ यांच्या मार्फत मूर्ती साकारण्यास सुरुवात केली जाते.त्यानंतर ही मूर्ती राऊळ बांधवांतील ज्येष्ठ मंडळी व तरुण मंडळी आजही आपल्या हाताने तयार करतात. तसेच मूर्ती बनविताना या कुटुंबातील तरुण मंडळी तसेच मूर्ती कामाची आवड असलेली लहान मुलेही मूर्ती बनविण्यासाठी हातभार लावतात. तयार झालेल्या गणेश मूर्तीला चतुर्थीच्या आदल्या दिवशी रंगविले जाते. यासाठी मळगांव मधील गणेश कला केंद्र ब्राह्मण पाट येथील गणेश मुर्तीकार जगन्नाथ चंद्रकांत राणे व त्यांचे सहकारी सदाशिव गणपत राणे,संदेश चंद्रकांत राणे सद्गुरू राणे, सत्यनारायण राऊळ, धनंजय राऊळ,दत्तप्रसाद कोचरेकर ( ब्राह्मण पाट) आदींचे मार्गदर्शन घेतले जाते.तर मूर्तीच्या डोळ्यांची नजर चतुर्थीच्या दिवशी पारंपरिक कारागिरांकडून प्रभाकर राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली उघडली जाते. हे या गणपतीचे एक खास वैशिष्ट्य आहे. माळीच्या घरातील गणेशोत्सव हा पारंपरिक सात दिवसांचा असतो.

मुख्य म्हणजे या घरामध्ये सर्वजण एकत्र येऊन रोज काकड आरती,दुपारची आरती व सायंआरती करुन गणराया ची आराधना करतात.तर पहिल्या दिवशी म्हणजेच मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशी गणेशाचे विधिवत पूजन झाल्यावर गणेशाला ह्या कुटुंबियांकडून वेगवेगळ्या सात प्रकारचा नैवेद्य दाखविला जातो आणि यातूनच सामुहीक भोजनाचा आनंदही लुटला जातो. शिवाय या घरातील प्रत्येक कुटुंबियांकडून गणेशाला आपल्या आवडीचाही नेवैद्य दाखविला जातो. उत्सवाच्या सात दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, लहान मुलांसाठी रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेतल्या जातात. घरातील सर्व कुटुंबातील महिला एकत्र येत रोज गणपतीसमोर विविध प्रकारच्या फुगड्या घालतात याशिवाय रोज सायंकाळी आरतीनंतर भजन व शेवटच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे सातही दिवस संपूर्ण घरात भक्तीमय वातावरण पसरलेले असते. सातही दिवस या घरात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांत ज्येष्ठ, तरुण मंडळींसह घरातील लहान मुलेही आनंदाने सहभागी होत असतात. सातव्या दिवशी चोवीस जणांच्या आधाराने श्रींचे भक्तीमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात विसर्जन केल्यानंतर सामुहिक भोजन घेऊन हे बांधव पुढच्या भेटीचे नियोजन करून आपापल्या कामासाठी मार्गस्थ होतात. सात दिवस आपल्या लाडक्या देवाची सेवा केल्यानंतर निरोपाच्या वेळी सद्गदित भावनेने पुन्हा पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची आस उराशी बाळगूनच गावातील वेस ओलांडतात.यावर्षीही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या उत्सवाला नातेवाईक मळगांव ग्रामस्थ, राजकीय व्यक्ती, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, शिक्षक, उद्योजक,व्यवसायिक, कलावंत आदींसहीत इन्सुली येथील राऊळ बंधू आदींनी या गणपतीचे दर्शन घेतले. तसेच माशीच्या घरातील नवदांपत्यांसहित होवसा न झालेल्या दाम्पत्यांनी होवसा पार पाडला. तर माळीचेघर मधील इच्छुक संतोष राऊळ, अनिल राऊळ,दामोदर राऊळ,विवेकानंद राऊळ,नितेश राऊळ या दाम्पत्यांनी श्री सत्यनारायण महापुजा करुन महाप्रसाद वाटला. तर माळीचेघर मधील अनेक कुटुंबियांनी गणपती ला गाऱ्हाणे घालून सुख समृद्धी, आरोग्य व नोकरी व्यवसायात भरभराट होण्यासाठी साकडे घातले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + nine =