बांदा
सावंतवाडी पंचायत समितीतील बांदा व आजगाव प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रयतेचा कैवारी जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
शिक्षण क्षेत्रातील एकमेव डिजिटल शैक्षणिक दैनिक रयतेचा कैवारी आयोजित प्रतिष्ठित समजले जाणारे ‘रयतेचा कैवारी शिक्षण भूषण, रयतेचा कैवारी जीवन गौरव, रयतेचा कैवारी विशेष सेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले. सदरील पुरस्कारांचे वितरण दैनिक ‘रयतेचा कैवारी’ च्या तृतीय वर्धापन दिनाच्या औचित्याने रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील बापूसाहेब डि.डी.विसपुते महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवार दिनांक दि.१८ सप्टेंबर २०२२ रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे.
पुरस्कारार्थीमध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकांना रयतेचा कैवारी शिक्षण भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या जेष्ठ मान्यवरांना ‘रयतेचा कैवारी जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोरोना काळात सर्वकाही बंद असताना ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून विशेष उल्लेखनीय शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘विशेष कार्य गौरव’ पुरस्कार देण्यात येणार आहे तर राज्यभरातील रयतेचा कैवारीच्या प्रतिनिधींना प्रेरणा मिळावी, या हेतूने निवडक ११ प्रतिनिधींना ‘विशेष सेवा गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सर्व पुरस्कारार्थीना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ आणि रयतेचा कैवारी दिवाळी अंक देण्यात येणार आहे. रयतेचा कैवारी जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संपादक शाहू भारती, जिल्हा प्रतिनिधी श्री जे.डी.पाटील ,सीमा पंडित, संदीप सावंत यांनी अभिनंदन केले आहे.