पालकमंत्री महोदयांनी जनता दरबारात आलेल्या तक्रारीसंदर्भात पुढील एक महिन्यानंतर आढावा बैठक नियोजित करावी…मनसेची आग्रही मागणी..!
कुडाळ
दि 12 ऑक्टोबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबाराचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने डी. पी.डी. सी. हॉल येथे 12 वाजता केले होते. जिल्ह्यातील जनतेला जनता दरबाराच्या माध्यमातून समस्यांनामधून दिलासा मिळण्यापेक्षा मनःस्तापच अधिक झाला असे चित्र आहे. जनता दरबाराच्या जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा पालकमंत्री जनता दरबारात पोहचल्याने सर्वसामान्य नागरिकांना तिष्ठत राहावे लागले ही खेदाची बाब आहे. पालकमंत्री महोदयांच्या जनता दरबार उपक्रमाचे मनसेकडून स्वागतच..परंतु जनता दरबाराच्या निमित्ताने जनतेच्या प्रशासनासमोर आलेल्या समस्यांबाबत पुढील एक महिन्याच्या कालावधीनंतर पालकमंत्री महोदयांनी तक्रारींच्या कार्यवाही संदर्भात आढावा बैठक नियोजित करावी अशी मनसेचे मागणी आहे. जनतेच्या समस्यांची पूर्तता झाल्यास व रेंगाळले ले प्रश्न तातडीने सुटल्यास जनता दरबाराचे खरे उद्दिष्ट सफल होईल व गतिमान प्रशासनाची प्रचिती मिळेल अन्यथा अपेक्षेप्रमाणे सर्वसामान्यांच्या समस्या व गाऱ्हाणी ही अशीच महिनोंमहिने शासन दफ्तरी धूळ खात पडून राहतील असे मत मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी व्यक्त केले आहे.