*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री ऐश्वर्या डगांवकर यांनी कवी वसंत बापट यांच्या “बाभुळझाड” कवितेचे केलेले रसग्रहण*
*बाभुळझाड*(रसग्रहण )
अस्सल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात बाभुळझाड उभेंच आहे
देहा फुटले वारा फांटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळांत खुपसुन बोटें बाभुळझाड उभेंच आहे
अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली बाभुळझाड उभेंच आहे
जगलें आहे, जगतें आहे
काकुळतीने बघतें आहे
खांद्यावरती सुताराचे घरटें घेऊन उभेच आहे
टक्….टक्..टक्…टक्..
चिटर् फटक्…चिटर् फटक्
सुतारपक्षी म्हातार्याला सोलत आहे, शोषत आहे
आठवते तें भलते आहे
उरांत माझ्या सलते आहे
आंत काही कळतें आहे, आंत फार जळते आहे
अस्सल लाकूड, भक्कम गांठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात बाभुळझाड उभेंच आहे.
***
वसंत बापट यांची ही कविता प्रतीकात्मक आहे.
एका वृद्ध पण खंबीर व्यक्ती चे चित्रण केले आहे.एका सोशिक मनुष्याचे वर्णन आहे उन वारा पाऊस सोसूनही
ज्याप्रमाणे बाभळीचे झाड उभेच असते त्याचप्रमाणे
अनेक संकटातून सुद्धा हा वृद्ध मनुष्य ताठ उभा आहे.एखाद्या रंजलेल्या गांजलेल्या समाज पुरूषाचे देखील हे वर्णन वाटते.
वसंत बापट यांनी या कवितेत माणसाच्या मनाची
तगमग खूप सुंदर वर्णन केली आहे.
बाभळीची पाने गळली तरी काटे मात्र तसेच असतात
त्या काट्यांना देखील सावली असतेच पण ते पाने गळलेले झाड कोणालाच आवडत नसते.ते नकोसे
वाटते त्याचप्रमाणे वृद्ध माणसाचे जीवन असते .त्याच्या मनाची व्यथा या बाभूळ झाडातून कवीने व्यक्त केली आहे.
अस्सल लाकूड,भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात बाभुळझाड उभेच आहे.
ही कविता वाचताना एखादा सुरकुतलेल्या चेह-याचा परंतु ताठ मानेने जगणारा मनुष्य डोळ्यासमोर उभा
रहातो.म्हातारा मनुष्य तोंडभरून आशिर्वाद देणारा,आणि आभाळायेवढी माया करणारा असतो.
मागचा पुढचा विचार न करता आयुष्यभर केवळ संसारासाठी /समाजासाठी कर्तव्य केले .पण ज्यांच्या
साठी केले ते लोक मात्र संकोच करतात. त्याचे असणे लोकांना जड वाटते.त्याचे अस्तित्व नकोसे वाटते.हे त्याला त्या मनुष्याला जाणवत आहे.आता त्याच्याकडून काही होत नाही म्हणून तो पुढील पिढिकडून आधार
मागत आहे .परंतु त्याच्या लक्षात येते की त्यांना आपण
नकोसे आहोत तेव्हा त्याच्या मनाच्या चिंध्या होतात
ते काटे त्याला टोचतात पण तरी तो त्याचाच उभा आहे
आधाराशिवाय. कारण तो एक पुरुष आहे.ज्याप्रमाणे पिता वृद्ध झाल्यावर आपल्या सर्व जबाबदाऱ्या मुलाच्या खांद्यावर देतो .परंतु जेव्हा तो मुलगा चार पैसे कमवायला लागतो तेहां तो आपल्या वडिलांना डोळे
दाखवायला सुरुवात करतो त्यांना कमी लेखतो तेव्हा मात्र तो वृद्ध पिता व्यथित होतो.आपल सर्वस्व पणाला
लाऊन तो मुलांना मोठं करतो .त्यासाठी वेळ पडल्यास तो आपली माती म्हणजे गांव किंवा घरदार सोडून देतो
आणि मग मात्र त्याच्या वाटेला अवहेलना येते.
आता ते झाड येवढे वृद्ध झाले आहे की पानच काय तर काटू देखील पिकले आहे म्हणजे आता त्या वृद्ध माणसात दम नाही तरी तो जगतो आहे कारण त्याने
जीवनात इतके काही सोसले आहे की मुलांनी दिलेल्या धक्कादायक वागणूकीतून तो सावरला आहे परत एकदा उभा राहिला आहे
जगले आहे ,जगते आहे काकुळतीने बघते आहे
खांद्यावरती सुताराचे घरटे घेऊन उभे आहे
टक् टक् चिटर फटक् यासारखे शब्द ज्याप्रमाणे सुतार पक्षी लाकडाला कुरतडून आपले घरटे बांधते त्याचप्रमाणे मुल मोठी झाली की वडिलांना असंख्य यातना देत असतात. त्याच्याच दमावर पुढे वाढून मागे
वडिलांना दूषणे देत रहातात त्यांची काळजी घेत नाही
त्यांचे ऋण मानत नाही .हे सर्व त्या म्हाता-या माणसाला
मनात सलते आहे.पण मुलांना मात्र ती जाणीव नाही. ते सतत वडिलांना नकोसे असल्याचा भाव दर्शवत रहातात
हाच सल उरात घेऊन बाभळीचे झाड उभे आहे.पश्चात्ताप होऊन काय उपयोग जे घडायचे, जे करायचे ते सर्व होऊन गेले आता त्याचा काही उपयोग
नाही .
आपण येथे असेही म्हणू शकतो की एखादा गावातील माणूस आपली माती सोडून शहरात मुलाकडे रहायला येतो तेव्हा त्याचे रहाणे,उठणे ,वागणे मुलासुनांना सहन होत नाही .ते सारखे त्याची उपेक्षा करत असतात ते जगणे त्या ताठ मानेने जगणा-या माणसाला त्रासदायक
होत असते.पण तो आपला हेका न सोडता ताठ मानेने
जगण्याचा प्रयत्न करत उभा असतो.तेव्हा त्याला
सर्वांसाठी केलेले आठवत असते.आणि ते व्यर्थ गेल्याची जाणीव होते तोपर्यंत खूप वेळ निघून जातो. मग तो परत एकदा नवीन जोमाने उभा रहातो.कारण मुळातच
तो एक खंबीर ,गंभीर असा व्यक्ती असतो. सौ ऐश्वर्या डगांवकर(लेखिका/कवयित्री). इंदूर. मध्यप्रदेश.