सावंतवाडीत कोरोनाचा विळखा वाढताच….
सावंतवाडीत रुग्ण नसताना काळजी घेणारे पालिका प्रशासन मात्र रुग्ण वाढल्यावर सुशेगाद

सावंतवाडीत कोरोनाचा विळखा वाढताच….

सावंतवाडीत रुग्ण नसताना काळजी घेणारे पालिका प्रशासन मात्र रुग्ण वाढल्यावर सुशेगाद.

सावंतवाडी शहरात किंबहुना तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सुरुवातीपासून क्वचितच आढळत होते, परंतु गेल्या काही दिवसांपासून सावंतवाडी तालुक्याने शतकी मजल मारली आहे, तसेच सावंतवाडी शहरातही गेल्या काही दिवसात रुग्ण वाढत आहेत. शहरातील पहिला ५३ वर्षीय व्यापारी कालच कोरोनामुळे आपल्या प्राणास मुकला. काही प्रमाणात वाढत्या रुग्ण संख्येचा धसका सावंतवाडी वासीयांनी घेतलेला पहायला मिळत आहे. परंतु तरीही शहरातील स्थानिक कोरोनाग्रस्तांची संख्या मात्र चिंतेचा विषय बनली आहे. शहरातील काही नामांकित डॉक्टर सुद्धा कोरोनाग्रस्त झाल्याने चिंतेत भर पडली आहे.
सावंतवाडीत रुग्ण नसताना शहरात जंतुनाशक फवारणी, मास्क सक्ती, सोशल डिस्टनसिंगचे पालन वगैरे कटाक्षाने पाळले जात होते, परंतु गणेशोत्सव कालावधीत मात्र त्याकडे बऱ्याच अंशी दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारपेठेत अनावश्यक वाढणारी गर्दी, भाजी मंडईत एकत्रित बसणारे भाजी व्यावसायिक, व खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता, कोरोनाच्या समूह संक्रमणाचा धोका संभवत आहे.
जिल्ह्या बाहेरून, गोवा, मुंबई इत्यादी ठिकाणाहून येणारे लोक बाजारपेठेत विनासायास फिरत आहेत, त्यामुळे बाहेरील राज्यात असलेले संकट सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाहेरून येणारे लोक घेऊन येत आहेत, त्या बाहेरून येणाऱ्या गाड्याकडे, लोकांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत कामासाठी जाणेसुद्धा जिकरीचे झाले आहे. काही डॉक्टर सुद्धा पॉझिटिव्ह असल्याने रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी जाणेही मुश्किल होत आहे.
गोवा राज्यातून तालुक्यातील गावांमध्ये बाहेरील लोक अगदी सहजच येत आहेत, त्या गावांतील सरपंच, पोलीस पाटील यांनीही गांभीर्य राहिलेले नाही. गावच्या सरपंचांकडे गोवा राज्यातून काही व्यक्ती आल्याची तक्रार केली असता, “गणेशोत्सव असल्याने कित्येक बाहेरील लोक येत आहेत, आम्ही तरी काय करायचं?” अशाप्रकारचे हतबल उत्तर त्यांच्याकडून येत आहे. काही गावांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली लागू असूनही नियम न पाळता भजने, आरती समूहाने सुरू आहेत. त्यामुळे सावंतवाडी शहर आणि तालुका धोक्याच्या किनाऱ्यावर उभा असल्याचे चित्र दिसत आहे.
सावंतवाडीत वाढणारे रुग्ण पाहता जिल्हा प्रशासनाने, तसेच सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेता वेळेतच उपाययोजना केल्या पाहिजेत. शहरात कोरोनाच्या फैलावाबाबत जनजागृती करून लोकांच्या अनावश्यक फिरण्यावर निर्बंध आणले पाहिजेत. मास्क न वापरता फिरणाऱ्यांवर सक्तीने दंडात्मक कारवाई केली पाहिजे. कोरोन्टाईन चा शिक्का असूनही बाजारपेठेत, गणेश दर्शनासाठी फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. स्थानिक लोकांपेक्षा बाहेरून आलेले लोकच नियम धाब्यावर बसवून बिनधास्त फिरत आहेत, पोलीस प्रशासनाने त्यांची तपासणी करून दोषी आढळल्यास कडक कारवाई केली पाहिजे. अन्यथा काही दिवसांसाठी आलेले पाहुणे जिल्ह्याला कोरोनाचा प्रसाद देऊन निघून जातील आणि जिल्हावासिय मात्र त्याचा पश्चाताप करत दिवस काढतील. गावात आलेल्या सुधारित विचारसरणीच्या लोकांनी कोविड-१९ बाबत असा मतप्रवाह बनविला आहे की, कोरोना हा रोगचं नाही आहे. त्यामुळे गावात लोक संभ्रमात आहेत.
सावंतवाडीत वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण पाहता प्रशासनाने गांभीर्याने यावर विचार करून कोरोनाचे संकट टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना केल्या पाहिजेत. लोकांनीही गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळून, मास्क, सोशल डिस्टनसिंगचा वापर कटाक्षाने केला पाहिजे. गरज असेल तेव्हाच बाहेर पडणे, लागणाऱ्या वस्तू, सामान एकदाच घेऊन जाणे, मार्केटमध्ये वगैरे जाणे शक्यतो टाळणे. अन्यथा स्थानिक पातळीवर कोरोनाचे संक्रमण जलद होण्याची भीती संभवत आहे.
सावंतवाडीत वाढते संकट पाहता प्रशासनाने तात्काळ उपाययोजना सुरू करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू करावेत. गणेश विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलीस, होमगार्ड यांच्याकडून नियंत्रण ठेवावे, एकत्रित गणेश विसर्जन होणे टाळावे, जेणेकरून समूह संक्रमण टाळता येईल. प्रशासनाने सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करावा आणि कोरोनाला शहरात हातपाय पसरण्यापासून रोखावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा