You are currently viewing आरोस परिवर्तन युवक मंडळाच्या पुढाकाराने गणेश चतुर्थीच्या सणाला गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व लेखक कवी श्री.दीपक पटेकर यांचा सत्कार….

आरोस परिवर्तन युवक मंडळाच्या पुढाकाराने गणेश चतुर्थीच्या सणाला गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व लेखक कवी श्री.दीपक पटेकर यांचा सत्कार….

सावंतवाडी :

 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब प्रत्येकाच्या घरात आनंद, उत्साह आणि हर्ष नांदावा अशी प्रेरणा घेऊन आरोस येथील 25 कुटुंबांना गणेश चतुर्थीच्या सणासाठी आरोस परिवर्तन युवक मंडळाच्या पुढाकाराने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम आरोस माऊली मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आरोस गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याकार्यक्रमाचे औचित्य साधून आरोस गावचे सुपुत्र लेखक व कवी श्री.दीपक पटेकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन आरोस परिवर्तन युवक मंडळाचे सदस्य बाळा परब, मंदार नाईक, महेश परब, निलेश देऊलकर,आनंद परब, नंदू परब, निखिल नाईक, अक्षय नाईक, संदेश देऊलकर यांनी केले.

जीवनावश्यक वस्तू वाटप कार्यक्रमावेळी मंडळाच्या वतीने बोलताना निखिल नाईक म्हणाले की, आपण सगळे जण आपल्या आरोस गावचे देणे लागतो या भावनेतुन श्री.देव गिरोबा, देवी माऊली आणि रवळनाथाच्या आशीर्वादाने आरोस परिवर्तन युवक मंडळाच्या वतीने आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यापुढेही आरोस परिवर्तन युवक मंडळ सर्वांच्या सोबतीने आरोस गावातील विद्यार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी तसेच कलाकारांसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून नेहमीच कार्यरत राहील.

निलेश देऊलकर यांनीही आरोस परिवर्तन युवक मंडळाने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करून मंडळाच्या वतीने राबविलेल्या उपक्रमासाठी आनंद व्यक्त करून सर्व उपस्थितांचे आभार मानले. लेखक कवी दीपक पटेकर आरोस परिवर्तन युवक मंडळाने केलेल्या सत्काराने भारावून गेले. गावाने केलेला सत्कार म्हणजे आपला घरचा सत्कार आहे आणि गावात झालेल्या सत्कारामुळे आपल्याला अत्यंत आनंद झाला असून आरोस परिवर्तन युवक मंडळाने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करत प्रत्येक गावात असे उपक्रम राबविले गेल्यास गावातील गोरगरिबांचे देखील सण उत्साहात आणि आनंदात जातील असे सांगत, आपल्या गावात केलेल्या सत्कारासाठी आरोस परिवर्तन युवक मंडळ व ग्रामस्थांचे आभार मानले.

आरोस गावातील 25 लाभार्थ्यांना आरोस परिवर्तन युवक मंडळाच्या वतीने यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरविले. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित म्हणून ग्रामपंचायत सदस्या सौ. मनीषा परब, लेखक व कवी श्री.दीपक पटेकर, ज्येष्ठ नागरिक श्री .शरद परब, गावचे पोलीस पाटील श्री.महेश आरोसकर, चंद्रकांत घोगळे, अमर घोगळे व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 15 =