You are currently viewing राजकारणापलीकडे जाऊन विकासकामे करुया –	 पालकमंत्री उदय सामंत

राजकारणापलीकडे जाऊन विकासकामे करुया – पालकमंत्री उदय सामंत

 

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. १२ :  विकासकामे करताना राजकारणापलीकडे जाऊन कामे करुया असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केले. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये आज पालकमंत्री श्री. सामंत यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेची आढावा बेठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, पंचायत समिती सभापती, विरोधी गटनेते श्री. डिचोलकर, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार प्रविण लोकरे, यासह सर्व नगर सेवक उपस्थित होते.

नगरपरिषदेला देण्यात आलेला सर्व निधी खर्च झालाच पाहिजे असे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, कामे होणे हे महत्वाचे आहे. ठेकेदारांनी कधी पर्यंत कामे पूर्ण करणार हे सांगावे, पारदर्शकपणे काम करावे, निधी कोणाच्या माध्यमातून आला याला महत्व नाही तर तो कसा खर्च झाला हे महत्वाचे आहे. माजी मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. हा निधी योग्य पद्धतीने खर्च होणे गरजेचे आहे. राजकारणामुळे काम थांबणे हे चुकीचे आहे. निकृष्ट कामांची चौकशी झाली पाहिजे. मुख्याधिकारी यांनी ही चौकशी करून त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा. किमान निम्मा निधी खर्च झाल्याशिवाय जिल्हा नियोजनमधून जास्तीचा निधी दिला जाणार नाही अशी माझी भूमिका आहे. त्यामुळे वेळेत कामे मार्गी लावावीत. येत्या ८ दिवसात नवीन कामांचे कार्यारंभ आदेश दिले जावेत आणि अपूर्ण असलेली कामे व कार्यारंभ आदेश दिलेली कामे सुरू झाली पाहिजेत, मच्छिमार्केटचे काम १ जानेवारी पर्यंत पूर्ण झाले पाहिजे अशा सूचना यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिल्या.

 

यावेळी  नगराध्यक्ष दिलीप गिरप आणि मुख्याधिकारी यांनी नगरपरिषदेच्या कामाचा अहवाल सादर केला. सुरुवातीस वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. तसेच गट नेते, पंचायत समिती सभापती यांनीही पालकमंत्री श्री. सामंत यांचे स्वागत केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा