You are currently viewing साधी माणसं

साधी माणसं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी प्रो.डॉ.जी आर उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*साधी माणसं*

 

ग्रीष्माच्या झळा , अजुनी हवेत तीव्र उष्णता . दोन तीन वळीव झाल्यामुळे, जरा बळीराजाच्या मनात सुखद गारवा ! ज्येष्ठ संपत आला असेल नसेल , तस दादांच्या सोप्यात लगबग वाढलेली ! कारण ही तसच रोहिणी नक्षत्रात पेरा करावा ! भुईमूग तरी पेरून घ्यावा असं मनात आलं ; तस त्यांनी गल्लीत सांगून टाकले . बी फोडायला

या अस म्हणताच , गल्लीतील लहान मोठी शाळकरी मंडळी हजर !

तस दादांचा सोपा म्हणजे , तीन मोठया पायऱ्या चढून, जोत्यावर असलेला भला मोठा 10 अंकण सोपा . सोप्यात नुकतीच फरशी बसवलेली .

खाली वर ओळीने एकाचवेळी 12 मुलं बसली ! त्यांच्या मधोमध शेंगाची पोती रिकामी केलेली ! पोर टचाटच फरशीवर शेंगांची नाक फोडीत होती व सोलपट बाजूला करीत होती . काही पोर तर शेंगा फोडीत होती व त्यांचा भिडू दाणे बाजूला करीत होता .

तस बघायला गेलतर हा वार्षिक सालाबादप्रमाणे होणारा कार्यक्रम ! खेड्यातील मुलांना तेवढेच खाऊचे पैसे मिळवून देणारा ! तर काहींच्या गरिबांना घरी पोट पूजा करणारा ! बस्स फक्त शेंगा फोडणे दाणे बाजूला करणे . नन्तर त्याला सुपात घालून पाखडणे . मापट्याला फक्त पाच पैसे , शेराला दहा पैसे !

वळीव पावसाने तर यंदा चांगलीच सुरवात केलेली ! रोहिणी नक्षत्र हे हमखास हुकमी एक्का ! ह्यावर्षी तर तसच झालेलं . मुलं शेंगा फोडीत होती व सोप्यातील खापर्या वर टप्पोर थेंब बरसत होते . जोत्याच्या बाहेर पन्हाळीने पाणी जे पडत होते . त्याचा पण एक नाद शेंगा फोडताना मिसळत होताच .

पन्हाळीत पडणारे पाणी बघून बंड्याने त्याचा नेहमीचा खेळ चालू केला . एका चिमुकल्या हाताने खांब पकडून दुसऱ्या तळ हातावर पावसाचे थेंब झेलत होताच . त्याला त्याच्या दादांनी दटावले , पण तिकडे त्याच लक्ष्य नव्हतंच मुळी ! पाऊस पडत होताच तस हवेत गारठा पण वाढलेला . इतक्यात सोप्यात गरमागरम चहाची किटली व कप आले ते सहानुभूती पूर्वकच ! कधी कधी सोबत चुरमुरे भडंग पण मिळत असे . दादांचा दानशूर पणा उभ्या गावाला माहीत होतं ! म्हणून कुठलंही दादांच काम म्हटलं की लोक जमत असतच.

ह्यावर्षी पण पाच एकर शेंग पेरायचे होतेच . त्याच बरोबर मुगाची व तुरीची पण पेरणी होणार होती. वळीवा बरोबर रोहीणे ने पण दमदार हजेरी लावली होतीच .

गावातील सर्व दगडमातीची घरे शेतात किती ओल झाली हे पण सांगत होतीच ! घरात पण आता भिंती ओलसरपणा दाखवत होत्याच . तर प्रत्येक घरातील छपरावर, राजाच्या मुकुटात जसा तुरा असतो, तसा ठिकठिकाणी हिरव्यागार गवताची पाती चमकत होती ! त्याच रूप सूर्यप्रकाश पडल्यावर आणखी खुलून दिसत होतं.

गल्लीतील सर्व भिंतीवर , गटारीच्या बाजूने , पडक्या घरातील भिंतीवर , जिथं जिथं खुल्ली जागा असेल तिथं तिथं विविध वनस्पती वाढत होत्या . बघेल तिथं किरमिजी रंगाची गुलबाक्ष फुले उठून दिसत होती .

शाळा सुटलेल्या वेळी, तर सहज रमत गंमत येणाऱ्या , लहान मुली ती फुले आवर्जून तोडत. त्याची एकमेकांत माळ गुंफून डोईत माळत . तो त्यांचा छंदच होता . एवढंच नाही तर दादांचा परसात, लाल पिवळी , किरमिजी असे अनेक प्रकारचे गुलबक्षा झाडे असत . ती तसेच चाफा पण डवरलेला असायचा . खूप पाऊस झाल्याचा परिणाम म्हणून परसात मातीला एक प्रकारचा सुवास पण यायचा . जो लगेच नाकाला कळायचा .

बघता बघता पेरण्या झाल्या पण ! गावातील पानंदीच्या वाटेला विविध रंगाची फुले येत . अनेक प्रकारच्या वनस्पतींनी वेलींनी

गावातल्या वाटा सुशोभित होत असत .

पाऊस आता नित्याचाच झाला, असे समजून विना बोभाटा सर्व कामे सुरळीत चालत असत फक्त फरक काय तर डोक्यावर मेन कापडाच उर्फ प्लास्टिकच आवरण ! भिजून कपडे चिंब होणं हा तर श्रावण सोहळ्यात जमा असे . भिजले की अंग कोरडे करणे कपडे बदलणे . हाच एक नियम .

पावसाळ्यात तुरकाट्या , पळकाट्या , शेंगांची फोलपट , मक्याची बुरकुंड फारतर शेणकुट ! हीच स्वयंपाक घरातील लढाईची अस्त्रे ! कधी कधी दावणीतील उरलेली वाळलेली कडब्याची धाट . पण ही सर्व सामुग्री निगुतीने माळवद किंवा पोट माळ्यावर जमा केलेली ! ह्यात मजा पण अशी असे की बऱ्याच वेळा त्यातुन विंचू

पण बाहेर पडत ! व आपला हिसका पण दाखवत असतच ! ह्या गोष्टी गल्लीत गावात कुठेना कुठे घडतच . परत त्यांचा लवाजमा दादा कडेच ! कारण त्यावरच त्याच जालीम औषध फक्त गावात दादाकडेच ! व ते ही विनामुल्य !

एव्हाना पावसाळा हा रस्त्यावर सुध्दा मुरलेला असे . कुठंतरी पाय निसरून घसरून पडण्याचा काळ व पोट धरून हसवण्याचा पण ! पंधरा ऑगस्टला तर प्रभात फेरीत नेमके चार दोन मुलं पडत असत व कपडे राड होत असत . पावसाळा म्हटलं की अंग मोडून येण , सर्दी पडसे खोकला . यावर एकच रामबाण औषध तांबडा हुलगा ( कुळीथ ) याच रात्री झोपताना माडग करून पिणं ! दुसऱ्या दिवशी

छु मंतर !! नाहीच कमी पडल

की सरळ दादांच घर गाठायचं ते देतील त्या गोळ्या घेऊन यायच ! विना मोबदला !

श्रावणाचे आगमन तर खेड्यात जोरदार व उत्तम होत ते लाह्या फोडण्याच्या भट्टीत ! घरटी प्रत्येकजण ऐपतीप्रमाणे लाह्या भाजून घेत असतोच . सोबत हरभरे पण ! नागपंचमीच्या तयारीत सगळं गाव लागलेलं असत .

प्रत्येक झाडावर झोपाळा टांगला जातो . मातीच्या नागांची पूजा होतेच शिवाय , दिंड ( हा एक ज्वारीच्या पिठाचा पदार्थ ) कानोले , पुरण पोळी अस करण्यात घरी आलेल्या माहेरवाशीण स्वतःला धन्य समजतात !

लाह्या , राळ्याचे लाडू , सारनोऱ्या , दिंड , तंबीट कुळीथ पिठलं हे सर्व पर्यावरण पूरक साधा आहार ! ज्यांनी पावसाळा बाधत नाहीच . उलट सुखकर होतसे . एव्हाना पाऊस रिमझिम चालू असतोच . शाळेतील विद्यार्थी शाळा सुटली की खिश्यात लाह्या फुटाणे कोंबून , ओढ्याला पाणी तसेच तळ्यात पाणी कितपत चढलंय हे पाहण्यासाठी रोज जात असत . गावात दोन तळी एक पाणी पिण्यासाठी तळ आणि दुसरं गायी म्हशी धुण्यासाठीच ! ओढा हा इतर खर्चासाठी, वापरणासाठी पाणी असे , सर्व स्रोत ते पाहत व लाह्या खात, मजेत हुंदडत असतच. शिवाय मोर कुठं नाचतो का ते नृत्य पाहण्यासाठी गायरान पिंजून काढीत ! मोर नृत्य तर रोज दिसत असेच तरीपण बालमनाची अतृप्तता ही होतीच !

कृष्ण जन्म अष्टमीला तर वेगळीच मजा असे . आधी आठ दिवस कृष्ण मंदिरात , राम कृष्ण हरीचा पहारा लावला जायचा . म्हणजे दिवसातील अष्ट प्रहर

रात्रंदिन ! दोन दोन मुले वा मोठी माणसं देखील प्रत्येकी 1 तास भजन करीत उभा राहायचे . यात पण गम्मत अशी की समोरचा किंवा दोघे उभ्या उभ्या डुलक्या घेत असतच ! सातव्या दिवशी गावातून शिधा त्यात धान्य , तेल तूप , भाजी जे काही असेल ते गोळा केला जाई . आठव्या दिवशी मोठा महाप्रसाद करून गाव जेवण दिले जाई . त्याच दिवशी परत मोठं मातीचे मडके घेऊन , गावभर फिरवले जाई . पण एकाच गल्लीत ते मडके दूध, दही, लाह्या लोणी याने भरले जाई . ते मडके कृष्ण मंदिर प्रांगणात उंचावर लटकावले जाई . महाप्रसाद झाल्यावर संध्याकाळी ते गोपालकडून फोडले जाई .

हे एवढ कमी म्हणून की काय , प्राथमिक शाळेची वर्षीक सहल, जवळच असणार्या कृष्णकाठी काढली जाई ! तरीपण जवळपास 3 किलोमीटर चालत जावे लागे . शाळेतील मुलं मुली दोन ओळीत शिस्तबद्ध रीतीने कृष्णा काठी जात . तिथं गेल्यावर लाल पाण्याचा अथांग सागरच असावा असे वाटे . तिथं गेल्यागेल्या गुरुजींच्या समोर मोठं धोतर अंथरल जाई . त्यावर प्रत्येक विद्यार्थी घरून आणलेला जेवणाच्या डब्यातील , चपाती भाकरी थालिपीठ भाजी , भजी दही मसाले भात दहीभात जे काही असेल ते गुरूंना ठेवलं जाई .

मग वन भोजन झाल्यावर , मूल पाण्यात किंवा इकडे तिकडे हुंदडत . गाण्याच्या भेंड्या लावल्या जात . तर काही वात्रट मुले ,नदीकाठी असलेले दगड पालथे करीत . आणि खरंच अजब म्हणजे , त्या दगडाखाली जिवंत विंचू व त्यांची पिले असत . वनभोजन व पावसाळा यावर दुसऱ्याच दिवशी निबंध लिहावा लागे .

गावातील प्रत्येक सण असाच साजरा होत असे . मग ते गणपती असेल किंवा दसरा असेल किंवा दिवाळी .

प्रत्येक ऋतूत , गावावर एक वेगळीच छटा बदलताना , दिसत होती . व त्या बदलत्या ऋतूंचे स्वागत करीत , त्यांच्या आहारात व राहण्यात आपोआप बदल होत असे एवढं मात्र नक्की .

 

 

 

प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी

 

अंकली बेळगाव

कॉपी राईट

1 जुलै 23

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − 7 =