वैभववाडी
नशाबंदी मंडळाचे काम कौतुकास्पद असून नशामुक्तीची चळवळ गावागावात पोहोचली पाहिजे. यासाठी पोलीस पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावावी असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री.अमित यादव यांनी केले.
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, शाखा सिंधुदुर्ग आणि वैभववाडी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस ठाणे वैभववाडी येथे पोलीस निरीक्षक श्री.अमित यादव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. नशाबंदी मंडळाच्या वतीने *उत्सव वाचवा-व्यसन घालवा* या अभियानाला सुरुवात करण्यात आली.
समाजामध्ये वाढणारी व्यसनाधीनता, उत्सव साजरे करण्याचे बदलते स्वरूप या अनुषंगाने पोलीस बांधव, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती सदस्य, ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य यांच्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर
नशाबंदी मंडळ जिल्हा समन्वयक अर्पिता मुंबरकर, सर्वशिक्षा अभियान कार्यक्रम अधिकारी स्मीता नलावडे, जिल्हा सदस्य प्रा.श्री.एस.एन.पाटील उपस्थित होते.
यावेळी श्री.अमित यादव यांनी व्यसन ही समाजाला लागलेली एक कीड असून त्याचे निर्मूलन झाले पाहिजे. या नशामुक्त अभियानाला पोलीस प्रशासनाकडून कायम सहकार्य राहील असे सांगितले.
नशाबंदी मंडळाचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र असून सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने तालुका आणि गाव पातळीवर प्रचार, प्रसार आणि प्रबोधनाचे कार्य सुरू आहे. व्यसन, व्यसनाची व्याप्ती याबाबत अर्पिता मुंबरकर यांनी उदाहरणासहीत सविस्तर माहिती दिली.
आज व्यसन करणे ही फॅशन बनली असून या व्यसनाचे व्यक्तीवर होणारे शारीरिक, मानसिक व आर्थिक दुष्परिणाम याबाबत प्रा.श्री. एस. एन. पाटील यांनी माहिती दिली.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाच्या ऑगस्ट २०२२ च्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
नशाबंदी मंडळाच्या माध्यमातून व्यसन व त्याचे दुष्परिणाम याबाबत शाळा, कॉलेज, महिला बचत गट तसेच गाव पातळीवर कशाप्रकारे प्रबोधन केले जाते याबाबतची माहिती प्रास्ताविकातून स्मिता नलावडे यांनी दिली. वैभववाडी तालुक्यातील वेंगसर गावच्या पोलीस पाटील यांच्या पुढाकाराने गावात तरुणांनी स्थापन केलेल्या व्यसनमुक्त समितीचा आदर्श इतर गावांनी घेतला पाहिजे.
या कार्यक्रमाला औदुंबर तळेकर, सुनील कांबळे, प्रमोद तावडे, राजेंद्र रावराणे, पांडुरंग कोर्लेकर, रविंद्र साळुंखे, अंकुश आंगवलकर, समिधा सावंत, विजय वाडेकर, श्रीकृष्ण विचारे, शरद राऊत, प्रदीप पाटील,लवु रावराणे, शशिकांत नारकर, दीपक पाटील, प्रकाश खाडये, विजय दळवी व प्रल्हाद पावले हे पोलीस पाटील व
माधुरी अडुळकर,
गणेश भोवड, जितेंद्र कोलते व योगेश तांडेल हे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
शेवटी व्यसनमुक्तीची साप शिडी हा खेळ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.