कणकवली :
ई स्टोअर या कंपनीने जिल्ह्यात गुंतवणूकदारांच्या केलेल्या फसवणुकीबाबत मनसेनेमार्फत आम्ही आवाज उठविला. त्यानंतर कंपनीचे जिल्हा देशातील काही प्रमुखांनी आम्हाला भेटून सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत करणार असल्याचे सांगितले. मात्र याबाबत कोणतेही लेखी आश्वासन न देता जेवायला जातो म्हणून सांगत परस्पर पळून गेले. त्यामुळे जिल्हावासीयांनी ई स्टोअरमध्ये गुंतवलेली रक्कम मागे मिळेल की नाही, याविषयी शंका आहे. त्यामुळे आधी सांगितल्यानुसार सर्व गुंतवणूकदारांना एकत्र करून ईस्टोअरच्या विरोधात एकत्रित तक्रार देणार असल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते.
उपरकर म्हणाले, आम्ही आवाज उठविल्यानंतर ई – स्टोअरचे गोवा व सिंधुदुर्गचे प्रमुख शैलेश पेडणेकर यांनी आमची भेट घेतली. ई – स्टोअरच्या दुकानांमध्ये ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर सामान उपलब्ध नाही. एप्रिल महिन्यापासून गुंतवणूकदारांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. याबाबत तुम्ही गुंतवणूकदारांना लेखी स्वरुपात शाश्वत उत्तर द्या, अशी मागणी आम्ही केली. कंपनीचे प्रमुख असलेले फैजल खान आता परदेशात असून ते हाँगकाँग येथील एका कंपनीच्या माध्यमातून पैसे आणणार आहेत. नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जातील, असे पेडणेकर म्हणाले. परंतू लेखी आश्वासन देण्यास त्यांनी नकार दिला. २६ ऑगस्टला ई स्टोअरचे भारताचे प्रमुख अनिल जाधव व परांजपे यांना तुमची भेट घेण्यास सांगतो, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार जाधव, परांजपे आम्हाला येऊन भेटले. गुंतवणूदारांचे पैसे परत केले जातील, असे लेखी आश्वासन द्या, अशी मागणी आम्ही त्यांच्याकडेही केली. मात्र, जेवायला जातो, असे सांगून दोघेही पळून गेले, असेही उपरकर म्हणाले.
जिल्हयातील गुंतवणूकदार नागरिकांची फसवणूक होत असल्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ई स्टोअरमध्ये जवळपास ४०० कोटींची गुंतवणूक झाली असून १०० कोटी रुपये कंपनीकडेच आहेत. कंपनीत असे काही एजंट आहेत, ज्यांनी ५० लाखांहून अधिक कमिशन घेतले आहे. ई – स्टोअरमध्ये केलेली गुंतवणूक तीन वर्षांमध्ये दुप्पट होते, असा प्रचार करून एजंटांनी लोकांकडून पैसे उकळले होते. गणेश चतुर्थीत स्वस्त धान्याच्या आशेने अनेकांनी पैसे गुंतवले होते. गुंतवणूकदारांमध्ये सर्वसामान्य बचतगटातील महिलाही आहेत, असेही उपरकर म्हणाले.
ई स्टोअर कंपनीचे कर्मचारी अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या फसवणूक करणाऱ्या कंपन्यांमधून काम करून आलेले आहेत. कर्मचाऱ्यांपैकी किमान १०० जण आहेत, ज्यांनी लाखो रुपये कमवले आहेत. यात शासकीय अधिकारी, शिक्षकांचा भरणा अधिक आहे. फसवणुकीबाबत आम्ही शुक्रवारी पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा अधिकारी यांच्याशी चर्चा केली. फसवणूकग्रस्तांनी एकत्रित तक्रार द्यावी, असे त्यांनी सुचविले. पण, पोलीस महासंचालकांकडेही तक्रार देणार असून वेळप्रसंगी मंत्र्यांनाही भेटू कारण कंपनीमार्फत राज्यभरातही कित्येकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. येत्या चार दिवसांत आम्ही फसवणूकग्रस्तांना एकत्र करून तक्रार देणार आहोत, असेही उपरकर म्हणाले.