प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा सरचिटणीस, भाजपा सिंधुदुर्ग
वेंगुर्ले :
वेंगुर्ले शहराबरोबर तालुक्यामध्ये काही दिवस सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याबरोबर कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शहरातील नागरिकांना तसेच तालुक्यातील ग्रामस्थांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. याबाबत विज अधिकारयांना जाब विचारण्यासाठी सोमवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११. ०० वाजता भाजपा वेंगुर्ले च्या वतीने विज वितरण कार्यालयावर धडक देणार असल्याचे भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले.
सद्ध्या सणासुदीचा काळ सुरू असुन, येत्या काही दिवसांत गणेशोत्सव सुरू होणार आहे. परंतु सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे गणेशोत्सवापुर्वी करण्यात येणारया कामांचा खेळखंडोबा होत आहे. त्याचप्रमाणे कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे गृहीणी तसेच व्यापारी वर्गाला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्याने गणेश मुर्तीकारांच्या कामावर परीणाम होत आहे. गणेश चतुर्थी एक आठवड्यावर आल्यामुळे मुर्तीकारांची लगबग सुरू आहे, परंतु सातत्याने विज प्रवाह खंडित होत असल्यामुळे मुर्तीकारांना काम करणे कठीण बनले आहे. तसेच कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे तसेच अति उच्च दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे गेल्या महीन्या भरात अनेकांचे इन्हर्टर, पंखे तसेच दुरदर्शन संच जळाल्याच्या घटना घडल्या आहेत.
याबाबत विज वितरण विभागास जाब विचारण्यासाठी भाजपा वेंगुर्ले चे कार्यकर्ते, सोमवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता अधिकारयांना भेटणार आहेत. तरी समस्त वेंगुर्ले वासीयांनी यावेळी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी केले आहे.