सावंतवाडी :
अ. भा. गांधर्व महाविद्यालयामार्फत घेण्यात आलेल्या एप्रिल २०२२ च्या परीक्षेत ‘शास्त्रीय गायन’ विषयातून प्रथमश्रेणीत सावंतवाडी तालुक्यातील आजगावच्या ममता प्रभू ने ‘संगीत विशारद’ हे सुयश संपादीत केले आहे. ममता प्रभू ही आजगांवसारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. अतिशय लहान वयात म्हणजेच वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी संगीत अलंकार वीणा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हे यश संपादित केले आहे. तिची मोठी बहीण वैष्णवी प्रभू हिनेही हल्लीच ‘नोव्हेंबर २०२१’ मध्ये ‘संगीत विशारद’ ही पदवी संपादित केली होती. मुख्य म्हणजे घरात संगीत क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना या दोन्ही बहिणींचे यश विशेष कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर ममता हिने सिंधुदुर्गात विविध ठिकाणी झालेल्या अभंग, भक्तीगीत, नाट्यगीत गायन स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिके पटकावित आपल्या नावाचा एक ठसा ऊमटविला आहे. तिने ‘संगीत विशारद’ परिक्षेत मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.