सावंतवाडी
कोकणात मोठ्या उत्साहात गौरी गणपतीचा सण साजरा केला जातो. या उत्सवात जातीय तेढ निर्माण होऊन जिल्ह्याची शांतता भंग होणार नाही. याची काळजी घेऊन आपला सण उत्साहात साजरा करूया असे आवाहन प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात आयोजित शांतता बैठकीत केले आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आज तहसीलदार कार्यालयात शांतता कमिटीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके, तहसीलदार श्रीधर पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी जयंत जावडेकर, गटविकास अधिकारी व्ही एम नाईक, पोलीस निरीक्षक शंकर कोरे, बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे, बांधकाम उप अभियंता अनिल आवटी आदी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी पानवेकर म्हणाले, घरगुती आणि सार्वजनिक गणपती उत्सव मंडळांनी काळजी घ्यावी. कुणाच्याही भावना दुखावणार नाही आणि गणपती उत्सव थाटात साजरा व्हावा म्हणून सुरक्षितता पाळावी. सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडप आणि व्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. विजमंडळाने वीज खंडित होणार नाही याची खबरदारी घ्यावी. गणपती समोर आरस करण्यात येणार आहे त्याबाबत देखील खबरदारी घ्यावी.गणेश विसर्जनाच्या वेळी देखील खबरदारी घेऊन कोणाच्याही भावना दुखवणार नाहीत याचे पालन करावे. शासनाने करोना साथीचे नियम शिथिल केले असले तरी त्याचा प्रसार टाळण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी.
पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके म्हणाल्या, गौरी गणपती सणाच्या काळात शांतता राखताना पारंपारिक वाद्यांचा वापर करावा. आक्षेपाहार्य देखावे आणि वैयक्तिक टीका टिपणी टाळावी. समाज भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची देखील दक्षता घ्यावी. सोशल मीडियावरून कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याचे देखील पालन करावे. सोशल मीडियावर सायबर टीमचे लक्ष असेल.