You are currently viewing जिल्हा बँकेच्या मडुरा शाखेतील नेटवर्क समस्या सोडवा

जिल्हा बँकेच्या मडुरा शाखेतील नेटवर्क समस्या सोडवा

चेअरमन संतोष परब, व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक : गणेशोत्सवात चांगली सेवा द्या

बांदा 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सावंतवाडी तालुक्यातील मडुरा शाखेत कायमस्वरूपी ग्राहकांची गर्दी असते. व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. कर्मचाऱ्यांकडून नेटवर्क समस्या सांगितली जाते. गणेशोत्सव तोंडावर आला असून ऐन उत्सवात शेतकरी ग्राहकांना कोणतीही अडचण किंवा ताटकळत उभे राहू नये यासाठी नेटवर्क समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी मडुरा विकास सोसायटी चेअरमन संतोष परब व पाडलोस व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी याकडे लक्ष देण्यासाठी आज मडुरा शाखेत दशक्रोशीतील ग्राहकांच्यावतीने मडुरा शाखा मॅनेजर श्री. दळवी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी मडुरा उपसरपंच विजय वालावलकर, माजी उपसरपंच उल्हास परब, पाडलोस सोसायटी माजी संचालक आनंद गावडे, पाडलोस तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल, शेतकरी सुभाष गावडे, विजय परब, रामचंद्र गावडे, आदी उपस्थित होते.

श्री. परब व श्री. नाईक म्हणाले की, बांदा किंवा आरोस-दांडेली शाखेत जास्तीत जास्त पाच मिनिटांत ग्राहकांचे काम होते. त्यामुळे शेजारील शाखेत ज्याप्रमाणे सेवा पुरविली जाते त्याचप्रमाणे मडुरा शाखेतही सेवा पुरवावी. आरोस-दांडेली शाखेत तर कधीही गर्दी नसते याचाही टेक्निकल यांनी अभ्यास करावा.

गणेशोत्सव सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून निदान चतुर्थी पर्यंत तरी चांगली सेवा देत ग्राहकांना ताटकळत उभे ठेऊ नका अशी मागणी आम्ही मडुरा दशक्रोशीतील ग्राहकांच्या वतीने आपणाकडे करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदर समस्येची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक विद्याधर परब व महेश सारंग यांनाही देण्यात आल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा