You are currently viewing कृष्णाला मग राधा होउन पुजतो श्रावण

कृष्णाला मग राधा होउन पुजतो श्रावण

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रकाश क्षीरसागर लिखित अप्रतिम लेख

कृष्णाला मग राधा होउन पुजतो श्रावण

श्रावण महिना म्हणजे सणासुदींचा महिना. महिलांसाठी श्रावण म्हणजे माहेरसरच जणू म्हणजे जशी पावसाची सर तशी श्रावणाची सर. कवींनी श्रावणाला साद घातली आहेच. परंतु गझलकारांनादेखील श्रावणाला गझलेत आणि शेरात गुंफण्याचा मोह होतोच की. श्रावण हा उत्साहाचे कारंजे असलेला सण.

सुनंदा पाटील तथा गझलनंदा आपल्या शेरात श्रावणाच्या या उत्साहाचे वर्णन आपल्या गझलेत कसे करतात पाहा.

उत्साहाची घरात माझ्या अवघी पखरण झाली
ओलेती तू समोर येता क्षणात आला श्रावण

उत्साहाची पखरण करत कुणी तरी आलं तो श्रावणच होता. श्रावणाने आपल्याला ती आल्याचा संदेश दिला आहे. उत्साहाला उधाण येते श्रावण सरीतूनच. उत्साह वाटत (गिव्हिंग) राहणारा आहे. ओलेती होऊन सखी जेव्हा समोर येते तेव्हा जणू श्रावणातील मृद्गंध येत असल्याचा सुवास होत आहे. सखी ज्या क्षणी सामोरी येते त्याच क्षणी श्रावण आल्याचा भास होतो. न्हाती धुती सखी तिचे केस सुकवीत येते, तो निराळा मदनगंध येत असल्याचा भास गझलेला होतो. आनंदाचे हे गझलेत उत्साहाने नाचत आहेत.
रामहरी पंडित तथा चंद्राशू यांना तर गझलेत पौराणिक संदर्भ दिले आहेत. श्रावण हा खरे तर भाव आणि भक्तीचा महिना आहे. त्या महिन्यात श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण हे प्रेमभक्तीचे प्रतीक आहे. श्रावणाच्या भक्तिभावाने रामहरी पुनीत झाल्याचा आनंद व्यक्त करीत म्हणतात. –
*श्रावणसर ही भक्तीमध्ये भिजते जेंव्हा*
*कृष्णाला मग राधा होउन पुजतो श्रावण*

रामहरी पंडितांना वाटते की, श्रावणात बरसणाऱ्या सरी भक्तीभावाने पृथ्वीवर आलेल्या आहेत. श्रावणात प्रत्येक वाराला म्हणजे दिवशी एकेका दैवताचे पूजन केले जाते. जसे सोमवारी महादेवाचे, मंगळवारी मंगळागौर आणि भवानी मातेचे बुधवारी विठ्ठलाचे गुरुवारी दत्तात्रेयाचे असे सर्वच दिवशी प्रत्येक देवाचे पूजन हा श्रावण आपल्या सरींतून करत असतो. या भक्तीमध्ये या श्रावणसरी भिजून चिंब झाल्या आहेत. प्रत्येक देवतेवर त्या अभिषेक करीत आहेत. त्या मनमुराद भक्तिमय झाल्या आहेत. जन्माष्टमी असल्याने गझलकाराला वाटते की, हा श्रावण स्वतः राधा होऊन कृष्णाचे पूजन करीत आहे.
आप्पा कसबेकर म्हणतात की
मेघ बरसतो धरणी भिजते,सरावतो मग श्रावण.
ती ओलेती हिरवळ होते,समावतो मग श्रावण.
मेघाच्या बसरण्याने धरणी भिजून चिंब झाली की तृप्त होते. मेघाच्या सातत्याने बरसण्याने धरती भिजते आणि धरणीला स्नान घालण्यात तो पटाईत झाला आहे. सराईत झाला आहे. धरणीला फुलवण्याला तो सरावला आहे. सर्वत्र हिरवळ झालेली आहे. सततच्या उन पावसाच्या खेळाने ही हिरवळ आता ओलेती झाली आहे. पुन्हा गझलकाराला सखीची आठवण होते. तीही सुस्नात होऊन ओलेती बाहेर आली की अशीच हिरवी हिरवी भासते. तिच्यात हा श्रावण सामावून जात आहे.
सगळ्याच गझलकारांना न्हातीधुती सखी भेटत आहे. यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे यांना तिची राहूनराहून परत आठवण होत आहे.
अल्लड होती श्रावणात ती भेटायाची होउन ओली
आज कोरडा झालो इतका डोळ्यांमधले सुकले पाणी
यशवंतरावांना वाटते आहे की त्यावेळी जशी ती भेटायची त्या अल्लड वयातील ती पावसात भिजून यायची तशीच ओलेती भेटायची. आपण ओलेती आहोत, याची जाणीव तिला नसायची तशीच त्या निरागस प्रियकराला ती आवडायची. तिचा अल्लडपणा गझलकाराला भावत असायचा. ते किशोरवयीन प्रेम आता पुन्हा अनुभवावे असेही वाटते. परंतु श्रावणसरीतून भेटलेला गंध तिची याद करून देतो. परंतु तिची आठवण करून देखील ती आता भेटत नाही. तिच्या आठवणींनी डोळे भरून येतात. विरहाच्या या आसवांनी तो दग्ध झाला आहे. आता तिच्या आठवणींनी डोळ्यांतील पाणी सुकले आहे. दुष्काळी भागाप्रमाणे त्याच मन कोरडे झाले आहे.
याच दिवसात नागपंचमी आणि नारळी पौर्णिमा हे सण येत असतात. श्रावणात सणांची आणि आनंदाची बहार असते. कृष्णजन्माचा सोहळा यानंतर येतो. ही श्रावणाची भक्ती ओथंबून वाहत आहे. डॉ. सुनंदा शेळके म्हणतात,

नागपंचमी, कृष्णाष्टमी, रक्षाबंधन..
दही-हंडीतुन गोपाळांचा काला श्रावण
जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असतो. तो गोपाळांनी गोड केलेला असतो. कृष्ण दह्याची गाडगी फोडायचा. त्यातील दही आणि तेथे ठेवलेले लोणी फस्त करायचा. आता दहीहंडी फोडण्याची स्पर्धा असते. त्यामुळे मस्ती करीत, चोरून दही फोडणाऱ्या श्रीकृष्णाची सर त्याला येत नाही. आता तो सारा व्यवहार झाला आहे

तरुण गझलकार नीलेश कवडे हा आशावादी आहे. श्रावणात हमखास पाऊस येणारच असा त्याला विश्वास आहे. तोही आपल्या सखीला सांगतो, तू श्रावणामुळे आनंदित हो.
जरासा श्रावणावर तू भरवसा ठेव राणी
पुन्हा बहरेल ही धरती पुन्हा गाईल गाणी
तू श्रावणावर भरवसा ठेव. तो आपल्यासोबत श्रावणसरी घेऊनच येणार आहे. त्यामुळे मधल्याकाळात पावसाने ओढ दिल्याने सुकलेल्या पिकांना संजीवनी मिळेल आणि ही धरती पुन्हा हिरवीगार होऊन पुन्हा श्रावणाची गाणी गाईल. आनंदाने गवतफुले डोलू लागतील. श्रावण मग गाणी गाईल आणि मुली, लेकीबाळी, सुना फेर धरून गाणी गात धरणीला साथ देतील. त्यामुळे श्रावण अधिकच खुलून दिसेल.
श्रावण म्हटले की माहेराला लेकी बाळी येतात. झाडांना बाधलेल्या झुल्यावर उंचच उंच झोके घेतात. आयाबाया आणि मुलीचे बाप मुलीच्या सासरी सांगावा धाडून त्यांना बोलावून घेतात. नवविवाहितेचा भाऊ तिला न्यायला येतो आहे हा निरोप घेऊनच जणू श्रावण आला आहे, असे प्रसाद माधव कुलकर्णी म्हणतात.
चहूदिशांना निरोप धाडत श्रावण आला
माहेराला मुली बोलवा ,श्रावण हिरवा…
चारी दिशांना गेलेल्या सगळ्यांच्या मुली आता माहेरी याव्यात याची प्रतीक्षा श्रावणालाही लागली आहे. तो वाऱ्यामार्फत आणि पावसाच्या ढगांमार्फत जणु असा सांगावा धाडत आहे. माहेराला मुली बोलवा असा निरोप गेला की त्या धावत माहेरी येतील. त्यांना त्याची ओढ असतेच परंतु बोलावणे आल्याशिवाय नाही, असा करारी आणि स्वाभिमानी बाणा त्यांचा असतो.
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर तथा सागर शायर हेही या श्रावणाच्या आणि त्याच्या लीलांच्या प्रेमात पडतात ते म्हणतात,
श्रावणाचा मास आला कोण येईल न्याया
झाड पाहे वाट माझी कोण खेळणार झुला?

श्रावणाचा मास आला की, बंधूराया येईलच राखी बांधण्यासाठी न्यायला. नारळी पौर्णिमेला आईने साखऱ (नारळी) भात केला असेल. भाऊरायासाठी ती राखी आणून ठेवते. श्रावणी सण साजरे करण्यासाठी आई कुणाला तरी पाठवील मग माझ्या जुन्या मैत्रिणी, सख्या, सया एकत्र येतील. पारावरच्या झाडावर झुला असेल मग आमच्यात शर्यत लागेल की, कोणाचा झुला उंच जातो. या क्षणाची वाट ते पारावरील झाडही पाहत असते.

प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
(९०११०८२२९९)

प्रतिक्रिया व्यक्त करा