You are currently viewing गुणांची उजळणी करूया

गुणांची उजळणी करूया

*काव्यप्रेमी शिक्षक मंच,अध्यक्ष सोलापूर शहर, ‘भारत विचार मंच’ सामाजिक संस्थेचे सदस्य, कवी, लेखक, ब्लॉगर, गायक श्री.महेश रायखेलकर लिखित अप्रतिम लेख*

*गुणांची उजळणी करूया*

एक व्यक्ती अनेकांशी जोडला गेलेला असतो. मित्र, नातेवाईक, शेजारी, सहकारी अश्या वेगवेगळ्या नात्यात तो गुंफलेला असतो. यांच्याशीच रोजचे व्यवहार तो करत असतो. त्याच्या संबंधित कोणताच माणूस हा परिपूर्ण नसतो. त्यात काही अवगुण असतातच. एक व्यक्ती म्हणून आपण दुसऱ्यांच्या अवगुणावर सहज बोट ठेवतो . ‘हा रागीटच आहे’ . ‘तो गर्वीष्ठच आहे’. ‘तमका गबाळाच’. ‘हा सतत चेष्टाच करतो’ अशी अनेक नावे आपण ठेवत असतो. प्रत्येक माणूस हा परिपूर्ण नाही हे खरे असले तरी त्यात आपल्याला घेण्यासारखा एकही गुण नाही असे कधीच होत नाही. पण आपण अवगुणांची बाराखडी वाचण्यात एवढे तल्लीन झालेले असतो की त्या व्यक्तींमध्ये असलेल्या गुणांची दखल आपण घेतसुद्धा नाही , मग ते गुण आपल्यात उतरविणे तर दूरचीच गोष्ट . एखादा व्यक्ती गर्वीष्ठ असेल तर तोच व्यक्ती टापटीप असेल, कर्तव्यात चोख असेल. एखादा व्यक्ती गबाळा असेल तर त्याच वेळेस तो प्रेमळ, संयमी असेल. एखादा व्यक्ती रागीट असेल तर त्याच ठिकाणी वक्तशीरपणा , प्रामाणिकपणा असे गुण असतील . अवगुणांची बाराखडी वाचण्याने त्या व्यक्तीची आपल्या मनातील प्रतिमा काहीशी नकारात्मक बनते. आपल्या ठायी त्याची तीच ओळख बनते आणि इतरांनाही त्या व्यक्तीची ओळख आपण तशीच करून देत असतो. आपण त्या व्यक्तीत असलेले गुण लक्षात घेत नाही . त्याच्या समोर त्या गुणांची प्रशंसा करण्याचा मोठेपणा आपल्यात नसतो. असे आपल्या जीवनसाथीच्या बाबतीत देखील घडू शकते. व्यक्तीच्या अवगुणांकडे थोडेसे दुर्लक्ष करून त्या व्यक्ती मधील असलेल्या गुणांची उजळणी केली तर ती व्यक्ती हवीहवीशी वाटेल. नातेसंबंध सुदृढ होतील . त्या व्यक्ती मधील गुण आपल्यात उतरविण्याचा प्रयन्त केला तर आपल्या संबंधित प्रत्येक व्यक्ती आपला गुरु बनु शकते. त्याच्याकडून आपण बरेच काही शिकू शकतो . फक्त गरज आहे तो आपला दृष्टिकोन बदलण्याची . अवगुणांची बाराखडी वाचण्यात आपला काहीच फायदा नसून झालेच तर नुकसानच आहे . गुणांची उजळणी मात्र नक्कीच फायदेशीर ठरू शकते . अशी गुणांची उजळणी करण्याची हातोटी आपल्या सर्वांना प्राप्त होवो या सदिच्छा!
(महेश भा. रायखेलकर)

प्रतिक्रिया व्यक्त करा