गोव्यातून चक्क सहा चाकी ट्रक मधून अवैद्य दारूची वाहतूक?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारूचा गोंधळ घालणारे हे रॅकेट कोणाचे?
महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होऊन जवळपास 45 दिवस झाले असून अगदी काही दिवसापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होत राज्य उत्पादन शुल्क खात्याचा कारभार दोन दिवसांपूर्वी शंभूराजे देसाई यांच्याकडे सोपविण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क खात्याला नवे मंत्री शंभूराजे देसाई लाभल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात एखादी बक्षीशी मिळावी त्याप्रमाणे गोव्यातून अवैद्य दारूचा साठा भरलेला सहा चाकी ट्रक सावंतवाडी येथील रेल्वे स्टेशन जवळ बेवारस स्थितीत उभा केलेला आढळून आला. जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सूत्रांकडून माहिती मिळताच सदरचा बेवारस उभा असलेला ट्रक (एमएच २४ एयु/ ०५७७) ताब्यात घेऊन तपासणी केली असता, २३ लाख ७६ हजार किमतीचे ७५० मिलीचे ७ हजार २०० बाटली असलेले ६०० कागदी खोके व १५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा मिळून ३८ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क खात्याने केलेली ही कारवाई खरोखरच स्तुत्य आहे परंतु सदर प्रकरणे केवळ मुद्देमाल हाती लागून किंवा दारू वाहतूक, दारूची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश होत नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या कारवाया होऊन दारू तस्करांवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या दारूच्या कारवायांमध्ये चार चाकी हायफाय मोटर गाड्यांचा काचांना क***** फिल्म लावून उपयोग केल्याचे आढळून येत होते परंतु महाराष्ट्रात नवे सरकार आल्यानंतर चक्क मोठ्या ट्रक मधून लाखो रुपयांची दारूची वाहतूक होताना दिसून आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर सावंतवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दारू तस्करी करणारी रॅकेट कार्यरत असून सावंतवाडी शहरातील अनेक बेरोजगार तरुण दारू तस्करीच्या या रॅकेटमध्ये गुंतलेले आहेत. सावंतवाडी शहरात गोवा बनावटीची दारू आणून वितरित करणे, त्याचप्रमाणे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीची अवैध दारू पोहच करणे, त्याचबरोबर जिल्ह्याबाहेरही अशा प्रकारच्या ट्रक मधून लाखो रुपयांच्या दारूचा पुरवठा करणे हा गोंधळ नेमकं कोणाचं रॅकेट करत आहे? याचा शोध लावणे राज्य उत्पादन शुल्क खात्याला आवश्यक आहे. एखाद्या परीक्षेला बसून पेपर न सोडवता परीक्षेत पहिले आल्याचे बक्षीस मिळाल्यासारखा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीमुळे बेवारस स्थितीत लाखो रुपयांची दारू भरलेला ट्रक मिळणे आणि त्यावर कारवाई केली म्हणजे ती कौतुकास्पद कामगिरी नव्हे तर गोव्याच्या हद्दीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारू भरलेला ट्रक पोहोचू शकतो हेच खरं राज्य उत्पादन शुल्क व पोलीस खात्याचे अपयश आहे. गोवा व महाराष्ट्र राज्य सिमेवरील तपासणी नाक्यांवर सिंधुदुर्ग जिल्हा बाहेरील पासिंगचा ट्रक संपूर्णपणे दारूने भरलेला असूनही कसा काय पास होऊ शकतो? हा देखील न सुटणारा प्रश्न, एक कोडंच आहे. त्यामुळे दारू तस्करी करणाऱ्यांबरोबर खाकी वर्दीतील कोण सामील आहेत का याची चौकशी होणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होऊन राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री म्हणून शंभूराजे देसाई यांनी जबाबदारी स्वीकारलेली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुन्हा एकदा निष्कलंक आणि प्रामाणिक मंत्री म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते असे नामदार दीपक भाई केसरकर यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारूचा गोंधळ घालणाऱ्या लोकांकडून अशा प्रकारची अवैध्य वाहतूक होत असेल आणि एखादा ट्रक पकडल्यानंतर ही कारवाई मॅनेज झाली का? आणि तो ट्रक बेवारस घोषित झाला असेल तर त्याची योग्य ती चौकशी होऊन सदरचे रॅकेट उघडकीस येणे आवश्यक आहे. अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि मुख्य म्हणजे नामदार दीपकभाई केसरकर यांचे होम ग्राउंड असलेल्या सावंतवाडी शहरातील तरुण पिढी अवैद्य धंद्यात गुरफटून बरबाद होणार आणि त्याचा काळिमा सुद्धा नामदार दीपक भाई केसरकर यांच्याच नावावर विरोधकांकडून लावला जाणार, हे मात्र नक्कीच….!
सावंतवाडी शहराबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध दारूचा घातलेला हा सावळा गोंधळ नव्या राज्य उत्पादन शुल्क मंत्री व पालकमंत्र्यांनी थांबवावा अशी अपेक्षा सावंतवाडी वासीयांकडून केली जात आहे.