*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री.बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सैनिक*
इंडिया गेटच्या दगडावर त्याच्या
नावाची रेघ कोरली जाते
तेव्हा शेजारच्या दगडाकडून गर्वाने
रेघ उमटण्याची वाट बघितली जाते..!
तुम्ही त्याला ओळखत नाही
तो तुमच्या करता प्राण देतो
तोही तुम्हाला ओळखत नाही
तरी तो तुमच्या करता जीव देतो.!
तो बलीदान देतो, या धरती करता
जी तुमची आहे आणि त्याची
पण तुम्ही त्याला काय देता .!
भ्रष्टाचार, फसवणूक, सडकं राजकारण, अंदागोंदी, लुटालुटं
विधवा पत्नी, पोरकी पोरं, रडणारी
म्हातारी आई,आक्रोशणार गांव
कां त्याने तुमच्याकरता मरावं..!
कां त्याने तिरंग्यात गुंडाळून घ्यावं
लोकशाही, घटनेचा, संस्कृतीचा तुम्ही मजा करत बेहोशीत …!!
स्वातंत्र्याचा उन्माद करीत नाचावं ?
तो तुमच्या करता मेला
तुमच्या स्वातंत्र्या करता मेला
या देशासाठी तो शहीद झाला
जेव्हां कधी तुम्ही तिरंग्याला
सलाम कराल
त्याच्या आठवणीने तुमचा
हात थरथरला पाहिजे
त्याच्या करता तुमच्या
डोळ्यात पाणी असले पाहिजे
त्या दगडावरची थरथरणारी रेघ
सन्मानाने शांत झाली पाहिजे …!!
बाबा ठाकूर