You are currently viewing जिजामाता हॉस्पिटल: ध्वजारोहणाच्या तपांचे अर्ध तप…..

जिजामाता हॉस्पिटल: ध्वजारोहणाच्या तपांचे अर्ध तप…..

*जिजामाता हॉस्पिटल: ध्वजारोहणाच्या तपांचे अर्ध तप…..*

*लेख सादर श्री जयराम धोंगडे*

१९२८ चे साल होते… खानदेशातील डॉ.ना.ग.भालेराव या तरुण डॉक्टराची वैद्यकीय अधिकारी म्हणून नांदेड मिल मध्ये नियुक्ती झाली… तेव्हा मागासलेल्या मराठवाड्यात एम.बी.बी.एस. डॉक्टर बोटावर मोजण्याइतकेच होते… देश पारतंत्र्यात होता… नांदेड इलाख्यात निजामशाही राजवट होती…. एखाद्या आजाराचे डॉक्टराकडे जाऊन उपचार करावेत… औषधपाणी घ्यावे, अशी सजगता नव्हती… देवर्षी, भोंदूबाबा, गंडेदोरे… इ. प्रथा, अंधश्रद्धेच्या विळख्यात सामान्य माणूस गुरफटलेला होता… स्त्री बुरख्यात बंद होती… मोठ्या घरच्या बायका ‘घोशा’त होत्या… स्त्री आरोग्य, बाळंतपण, प्रसूतीपश्च्यातची निगा आणि काळजी, बाळाचे आरोग्य, बालमृत्यू अशा अनेक समस्या आणि त्याबद्दलचे अज्ञान या डॉक्टरांपुढील समस्या होत्या… डॉक्टरांकडे बायकांना तपासून घ्यायची प्राज्ञा नव्हती… त्यात पुरुष डॉक्टरकडे दाखवून घेणे… अशक्य कोटीतील गोष्ट!
परंतु डॉ.ना.ग.भालेरावांचे (नाना) वैद्यक कौशल्य, औषधासोबत त्यांचा हातगुण… खानदेशी अस्सल प्रेम, माणुसकी आणि वेळीअवेळी अडल्यानडल्यांना मदत करण्याच्या वृत्तीमुळे लोक त्यांच्याकडे धाव घेऊ लागले… अजूनही स्त्री रुग्ण मात्र धजावत नव्हते… त्यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी प्रमिलाताई सोबत विचारविमर्श केला… स्त्री आरोग्यासाठी त्यांनी स्वतःच्या पत्नीला मध्यप्रदेशातील इंदोर येथे नर्सिंग कोर्ससाठी पाठविले… एक प्रशिक्षित परिचारिका तयार झाली… बायकांना आपली आरोग्यविषयक समस्या सांगता यावी अशी विश्वासू मैत्रीण प्रमिलाताईच्या(ताई) रुपात उपलब्ध झाली.
१९२८-३८ या दशकभरात नाना-ताई यांनी मिळून समाजात आरोग्यविषयक सजगता आपुलकीने निर्माण केली… पैशा अभावी कधी उपचार अडले नाही… १९३८ ला त्यांनी ‘भालेरावाचा दवाखाना’ उभा केला… बाळंत स्त्रियांना जणू आपण माहेरात आलो, असे वाटावे इतके सौजन्य आणि प्रेम नाना-ताईनी दिले… अंघोळीला गरम पाणी, वरणभात तुपाचे जेवण… बाळंतणीला दिले जाई!
काळ सरकत राहिला… १९४७ ला भारत स्वतंत्र झाला… मराठवाडा १९४८ ला निजामशाहीच्या जोखडातून मुक्त झाला… २६ जानेवारी १९५० ला भारत प्रजासत्ताक झाला… देशभर गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला… राष्ट्रीय तिरंगा दिमाखाने फडकविण्यात आला… राष्ट्रीय ध्वजारोहण भालेरावाच्या दवाखान्यातही केलं गेलं… १९५० पासून राष्ट्रीय ध्वजारोहण आणि ध्वजाला मानवंदना देण्याची परंपरा भालेराव परिवाराने सुरु केली.
नाना-ताई यांनी लावलेला आरोग्यसेवेचा हा वृक्ष बहरत गेला… त्यांचे सुपुत्र डॉ. मोहन भालेराव आणि डॉ.सविता भालेराव यांनी ‘भालेरावाचा दवाखाना’, नाना-ताईच्या साक्षीने, वात्सल्याचे मूर्तिमंत उदाहरण आणि उद्दात संस्काराचे प्रतिक असलेल्या जिजाऊ मासाहेब, यासारखे या दवाखान्यात जन्मलेले नवजात शिशु घडावेत या भावनेने रुग्णालयाचे नामकरण ‘जिजामाता हॉस्पिटल’ असे केले…. जिजामाता नावाचा हा वेलू गगनभरारी घेत गेला… या जोडगोळीने मिळून ५०००० च्या वर बिनटाक्याच्या कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केला… ‘छोटे कुटुंब-सुखी कुटुंब’ या इंदिरा गांधीच्या २० कलमी कार्यक्रमात महाराष्ट्रातून डॉ.सविता-डॉ.मोहन यांनी मोलाचे योगदान दिलं… ‘जे नवे-ते हवे’ हा भालेराव परिवाराचा ध्यास… कोणतेही नवे तंत्रज्ञान येवो, ते नांदेडात उपलब्ध करण्याचा त्यांचा ध्यास आहे… त्यामुळे सर्वप्रथम सोनोग्राफी, ई.सी.जी., यासारखे तंत्रज्ञान येथे उपलब्ध झाले…. डॉ. उमेश-डॉ.विभा, ही भालेरावांची तिसरी पिढी…. डॉ. विभा भालेरावांनी टेस्ट ट्यूब बेबीचे तंत्रज्ञान अवगत केलं… उपलब्ध केलं… आणि निराश, हताश निसंतान जोडप्याला संतती सुखाची प्राप्ती करून दिली. डॉ. उमेश भालेराव यांनी आपल्या वडिलांचे कॅन्सर हॉस्पिटलचे स्वप्न ‘मोनार्क हॉस्पिटल’ ची निर्मिती करून पूर्ण केले… डॉ.उमेश भालेराव यांनी डायलिसीस, सिटी स्कॅन, एम.आर.आय. सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले…. ‘विश्व इन्स्टिट्यूट’ ही मूत्ररोग व मूत्रपिंड रोगाला वाहिलेली परिपूर्ण संस्था डॉ.सुशील राठी यांच्यासमवेत स्थापन केली… २०२० पासून भालेरावाच्या चौथ्या पिढीचे नेतृत्व डॉ. अभिषेक आणि डॉ. प्रियंका करीत आहेत.
समस्त डॉ.भालेराव परिवाराच्या अथक प्रयत्नातून नांदेडमध्ये वैद्यक क्रांती झाली. या पवित्र आरोग्यदानाच्या कार्यातून त्यांनी समाजसेवा आणि राष्ट्रसेवा साध्य केली, असे मला मनोमन वाटते. सरकारी, निमसरकारी आणि सहकारी संस्था, कार्यालये आणि आस्थापनात दरवर्षी स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताकदिन साजरा होतो… तेथील सर्वच कर्मचारी वृन्दांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ असते… या राष्ट्रीय सणात त्यांना सामील होता येते… परंतु खाजगी क्षेत्रात कोणी ध्वजारोहण करतांना दिसत नाही… राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम वाढावे… कर्मचारी वर्गाला या राष्ट्रीय समारंभात सामील होता यावं… या उद्देशाने सुरु केलेल्या या उपक्रमास आज ७२ वर्षे होत आहेत… पिढ्यानपिढ्या हा राष्ट्रभक्तीचा वारसा समृद्ध होत आहे… जसे या परिवाराने वैद्यक क्षेत्रात योगदान दिले किंबहुना त्याहून अधिक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांची भरीव कामगिरी आहे.
१९५० ला सुरु केलेली ध्वजारोहणाची परंपरा आजही सुरु आहे… १९५०-२०२२, गेली बहात्तर वर्षे हा राष्ट्रीय उत्सव जिजामाता हॉस्पिटल परिवार अव्याहतपणे साजरा करतो आहे… तपांचं अर्ध तप यावर्षी पूर्ण होत आहे… ज्ञानाने श्रीमंत भालेराव परिवार मनानेही फार श्रीमंत आहे… दरवर्षी हॉस्पिटलमधील कर्मचारी वर्गाच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहण केले जाते… सर्वांच्या चहापानाने कार्यक्रमाची सांगता होते… ज्याच्या हस्ते ध्वजारोहण होते, त्याच्या आनंदाला पारावर नसतो… आणि ध्वजही आनंदाने डौलत राहतो. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना या परिवाराचा मी एक भाग असल्याचा मला अभिमान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने समस्त भालेराव परिवारास मानाचा मुजरा!

*जयराम नारायण धोंगडे*
प्रशासक, विश्व इन्स्टिट्यूट युरॉलॉजी व किडनी सेंटर, नांदेड

प्रतिक्रिया व्यक्त करा