डॉ. विशाखा सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने “नॅशनल युथ आयकॉन अवॉर्ड २०२०-२१” सन्मानित
सिंधुदुर्ग :
भाजपचे युवानेते आणि युवा उद्योजक विशाल परब यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विशाल परब यांच्या वतीने होणाऱ्या सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रमांसाठी डॉ. विशाखा सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने “नॅशनल युथ आयकॉन अवॉर्ड २०२०-२१” देऊन त्यांना गौरविण्यात आले. शुक्रवारी नवी दिल्ली येथील नव्या महाराष्ट्र सदनात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून जागतिक युवा संघटना राष्ट्रीय युवा पुरस्कार फेडरेशन ऑफ इंडिया, राष्ट्रीय युवा आणि आयजी पुरस्कार, युवा संसद, युवा महोत्सव आणि राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे शुक्रवारी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विशाल परब याना “नॅशनल युथ आयकॉन अवॉर्ड” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मिझोरामचे माजी राज्यपाल अमुलक रतन कोहली आदी मान्यवर उपस्थित होते.
विशाल परब यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या कारकीर्दीत एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विशाल परब हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा उद्योजक म्हणून परिचीत असून सामाजिक उपक्रमांसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराने सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.