सावंतवाडी :
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी निवड झालेले मान.नाम.दीपक केसरकर यांचा सावंतवाडीत गांधी चौक येथे भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी हि. हा. श्री. खेमसावंत भोसले (राजेसाहेब) व माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप उपस्थित राहणार आहेत. आपला सांगली कोल्हापूर दौरा आटोपून नाम.केसरकर आज मतदारसंघात दाखल होणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते नाम.दीपक केसरकर यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार होणार आहे.
सावंतवाडी मतदारसंघाला माजी आरोग्यमंत्री स्व.भाईसाहेब सावंत यांच्यानंतर जवळपास ३६ वर्षांनी पुन्हा एकदा दीपक केसरकर यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. नाम.दीपक केसरकर यांना मिळालेले कॅबिनेट मंत्रिपद हे जिल्ह्यासाठी भूषणावह असून विकासाचे व्हिजन असलेल्या नेत्याला मिळालेल्या कॅबिनेट मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्याचा विकास आणि उन्नत्ती साधण्यासाठी होणार यात शंकाच नाही. अत्यंत प्रामाणिक आणि शांत संयमी नेता अशी ओळख असणारे नाम.दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेचा स्वीकृत नगरसेवक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. यशाच्या अश्वावर स्वार झालेले दीपक केसरकरांनी त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. सावंतवाडी शहराचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले अतुलनीय कार्य सावंतवाडीकर जनता कदापि विसरू शकणार नाही. सावंतवाडी नगरीचे नगराध्यक्ष पद भूषविल्यानंतर सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार म्हणून तीन वेळा विक्रमी मतांनी त्यांनी विजय मिळविला आहे. शिवसेना भाजपाच्या युती सरकारमध्ये वित्त व गृह राज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी उत्तमरीत्या जबाबदारी पार पाडली होती.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्वपक्षाकडून आणि आघाडी सरकारकडून दुर्लक्षित राहिलेल्या नाम.दीपक केसरकर यांच्यावर शिंदेगटाचे मुख्यप्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवित एकनाथ शिंदे यांनी केसरकरांचे महाराष्ट्रातील राजकारणात असलेले नेतृत्व अधोरेखित करत राज्यमंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीपदावर त्यांना विराजमान केले. महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदू राहिलेले सावंतवाडी मतदारसंघाचे लोकप्रिय नेतृत्व मान.नाम.दीपक केसरकर आज सावंतवाडीत दाखल होत असून आज दुपारी सावंतवाडीत त्यांचा माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते व ही.हा.खेमसावंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली भव्य नागरी सत्कार होत असून सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यातील सर्व दीपक केसरकर प्रेमी शिवसैनिकांनी या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष श्री.राजन पोकळे यांनी केले आहे.