You are currently viewing दान मागते..

दान मागते..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दान मागते …*

 

विवाह बंधन पवित्र बंधन मान तयाचा राखशील का?

अर्धांगी मी म्हणवणार रे दाद तयाला देशिल का ?

 

तू राजा मी राणी म्हणूनी सन्मानाने ठेवशील का ?

पायदळी मज तुडवताच कुणी रक्षण माझे करशिल का ?

 

तळहाती मी झेलिन तुजला हृदयी मजला धरशील का?

पराधीन मी नाही भावना पटवून जगाला देशिल का?

 

स्वयंभू माझ्या अस्तित्वाला जनी मानसी जपशिल का?

आत्मभान मी माझे जपता साथ तयाला देशिल का?

 

विरघळून मी गेले तरी ही मला वेगळी करशिल का?

खांद्यावरती विसावता मी आश्वासक तू होशिल का ?

 

माझी अस्मिता स्वाभिमान तू बनून शिंपला जपशिल का?

पाणीदार मी मोती मजला तळहातावर घेशिल का?

 

गुलाम म्हणूनी नाही जन्म रे घेईन खांद्यावर भार

अग्निशिखा तेजस्वी मी तलवारीची मी धार…

 

तुझ्यासंगती बरोबरीने पैलतीरी मज नेशिल ना?

सात पाऊले दान मागते बरोबरीने चालशिल का ..?

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

दि : १२ ॲागष्ट २०२२

वेळ : दुपारी २: ०९

प्रतिक्रिया व्यक्त करा