शुक्रवारी 12 मे रोजी बैठक घेऊन स्पर्धेची पुढील तारीख होईल निश्चित
मालवण :
मालवण तालुक्यातील शिल्पा खोत व यतीन खोत मित्र मंडळाच्या वतीने नारळी पौर्णिमा निमित्ताने सोने चांदीच्या बक्षीसांचा वर्षाव असणारी जिल्हास्तरीय महिला नारळ लढवणे स्पर्धा जोरदार पाऊस व वारे यामुळे स्थगित करण्यात आली आहे.
शुक्रवारी 12 मे रोजी बैठक घेऊन स्पर्धेची पुढील तारीख आयोजकांच्या वतीने निश्चित केली जाईल. अस्सल सोन्याची चार नाणी, सोन्या-चांदीपासून बनवलेला नारळ, सोन्याची नथ, चांदीची दिवे, पैठणी असा लाखोंच्या बक्षीसांचा वर्षाव असलेली ही स्पर्धा बंदर जेटी येथेच भव्य दिव्य स्वरूपात आयोजित केली जाईल, अशी माहिती आयोजक शिल्पा खोत व यतीन खोत यांच्या वतीने देण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी महिला नारळ लढवणे स्पर्धा अशी ओळख प्राप्त असलेल्या या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने महिला स्पर्धक मालवण बंदर जेठी येथे दाखल झाले होते. शेकडो स्पर्धकांची नाव नोंदणी झाली होती. तसेच स्पर्धे निमित्ताने कोळी नृत्य किंवा कोंबडा नृत्य यासाठी कलाकार दाखल झाले होते.
परंतु मुसळधार पाऊस वारे यामुळे अपेक्षित पद्धतीने भव्य दिव्य स्वरूपात स्पर्धेचे आयोजन करणे शक्य नसल्याने सर्वांमध्ये स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती शिल्पा खोत यांनी दिली.