इचलकरंजी :
राज्य शासनाने कोरोनाचे सावट दूर झाल्याने सर्व धार्मिक सण, उत्सवावरील निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने हिंदू धर्मियांचा महत्वाचा सण म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सव सण साजरा करण्यावर कोणतेही बंधन घालू नये. तसेच घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन शहापूर खणी ऐवजी पंचगंगा नदीपाञातच करण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन आज बुधवारी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने महापालिकेचे उपायुक्त डॉ.प्रदीप ठेंगल यांच्याकडे सादर केले.
मागील दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने सर्व सण, उत्सव साजरा करण्यावर कठोर निर्बंध घातले होते.या निर्बंधांचे सार्वजनिक मंडळांबरोबरच नागरिकांनी देखील काटेकोर पालन करुन शासनास सहकार्य केले आहे. परंतू, सध्या कोरोनाचे सावट दूर झाले असतानाही स्थानिक प्रशासनाकडून यंदाच्या गणेशोत्सव सणावर काही प्रमाणात निर्बंध घालण्याचा प्रयत्न होत आहे. घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन शहापूर खणीतच करावे, अशा सूचना इचलकरंजी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. परंतू ,याला शहर परिसरातील सार्वजनिक मंडळांसह सर्वसामान्य नागरिकांचा तीव्र विरोध होत असल्याचे दिसत आहे.तसेच घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदी पाञातच करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.
याबाबत अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी आजी माजी लोकप्रतिनिधींसह महापालिकेचे प्रशासन अधिकारी सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. याच अनुषंगाने आज बुधवारी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने महापालिकेचे उपायुक्त डॉ.प्रदीप ठेंगल यांची भेट घेवून त्यांच्याकडे निवेदन सादर केले.यामध्ये हिंदू धर्मियांचा पवित्र सण गणेशोत्सव हा कोणत्याही बंधनाशिवाय तसेच घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीपाञातच करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन सादर करणा-या शिष्टमंडळात अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहराध्यक्ष संतोष सावंत, अरविंद माने, दीपक रावळ, नितेश पाटील, विजय मुतालिक, नितिन कटके, वैभव खोंद्रे, आनंदा मकोटे, उत्तम चौगुले, सचिन जाधव, सागर जाधव, संतोष चव्हाण, सुभाष बावडेकर, दिनेश जोशी, योगेश लंबे, अमोल अडसूळ, अनिकेत देसाई, प्रितम कोरे यांचा समावेश होता.