You are currently viewing वैभववाडी मांडुकलीत पाणी भरले, गगनबावडा-कोल्हापूर मार्ग ठप्प…

वैभववाडी मांडुकलीत पाणी भरले, गगनबावडा-कोल्हापूर मार्ग ठप्प…

वैभववाडी

कोकणात गेल्या चार-पाच दिवसापासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. नदी नाल्यांना महापूर आल्याने पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने सायंकाळी उशिरा गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मांडुकली दरम्यान रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग ठप्प झाला आहे.

गेल्या तीन-चार दिवसापासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात धो-धो पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे गगनबावाडादरम्यान मांडुकली, किरवे, लोंघे येथे मंगळवारी सायंकाळपासून रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. तर भुईबावडा व करुळ या दोन्ही घाटमार्गात किरकोळ पडझड सुरू आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र गेले चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे.वैभववाडी व गगनबावडा परिसराला जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सोमवारी मुसळधार पावसामुळे करुळ घाट रस्ता खचल्याने वाहतुकीस बंद करण्यात आला तर मंगळवारी सायंकाळी गगनबावडा तालुक्यात मांडूकली नजीक राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी आल्याने सिंधुदुर्ग–कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पुर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून होणारी वाहतूक आंबोली व राधानगरी घाट मार्गे वळविण्यात आली आहे.
गेले चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांना बसला आहे. घाटमाथा व कोकण यांना जोडणारा दुवा म्हणून करूळ घाट ओळखला जातो. परंतु दोन दिवसांपूर्वी घाटातील संरक्षक भिंत कोसळल्याने संबंधित प्रशासनाने हा मार्ग वाहतुकीस बंद केला आहे. मंगळवारी सायंकाळी सिंधुदुर्ग–कोल्हापूर मार्गावर गगनबावडा तालुक्यातील मांडूकली येथे राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी आले. कुंभी धरणाचे पाणी सोडल्याने कुंभी नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. रस्ता पाण्याखाली गेल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
कोल्हापूरहून सिंधुदुर्गात येणारी वाहने राधानगरी मार्गे येत आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होणारी वाहतूक आंबोली व फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच कायम ठेवल्यास सिंधुदुर्ग–कोल्हापूर हा मार्ग अनिश्चित काळासाठी बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा