अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन ; मनसेचा महापालिका प्रशासनास इशारा
इचलकरंजी शहरातील घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे पंचगंगा नदीमध्ये विसर्जन करण्यास परवानगी द्यावी यासाठी मनसेच्या वतीने इचलकरंजी महापालिकेचे उपायुक्त डॉ.प्रदीप ठेंगल यांना निवेदन देण्यात आले. तसेच याबाबत परवानगी न मिळाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनसेच्या वतीने महापालिका प्रशासनास देण्यात आला.
मागील २ वर्षे कोरोनामुळे सर्वच सण व उत्सवावर निर्बंध घातले होते. त्यामुळे गणपती उत्सव हा देखील प्रशासनाचे निर्बंध पाळून नागरिकांनी साजरा केला. इचलकरंजी शहरातील घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीमध्ये न करता शहापूर खणीत करून प्रशासनास सहकार्य केले होते. मात्र यंदा कोरोना प्रादुर्भाव नसल्याने सरकारने सर्व निर्बंध हटवले आहेत. नदी प्रदूषण रोखण्यासाठी सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन शहापूर येथील खणींमध्ये करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र या खणीमध्ये जलपर्णी व केमिकल मुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. विसर्जनानंतरही गणेशमूर्तीची विल्हेवाट व्यवस्थित होत नाही. त्यामुळे अशा खणीमध्ये गणपती विसर्जन करण्याचा प्रशासनाने
निर्णय घेतल्याने नागरिकामंधून नाराजीचा सूर उमटत आहे. एकीकडे प्रशासन नदी प्रदूषित होण्यापासून वाचण्यासाठी
उपाययोजना करत आहे ,तर दुसरीकडे शहापूर येथील दुरवस्थेतील खणीच्या दूषित पाण्यात गणपती विसर्जनाचा निर्णय घेतल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या जातील .या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन पंचगंगा नदीमध्ये करण्यास परवानगी मिळावी अशा मागणीचे निवेदन इचलकरंजी महापालिकेचे उपायुक्त डॉ प्रदीप थेंगल यांना देण्यात आले.
तसेच याबाबत परवानगी न मिळाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनसेच्या वतीने महापालिका प्रशासनास देण्यात आला.
यावेळी मनसेचे शहराध्यक्ष प्रताप पाटील, उपजिल्हाध्यक्ष रवी गोंदकर, शहाजी भोसले, मनोहर जोशी, मोहन मालवणकर , राजेंद्र निकम , महेश शेंडगे
आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.