पणदूर :
आज मंगळवार दिनांक ९ ऑगस्ट २०२२ रोजी वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूरतिठा या प्रशालेमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आजी-माजी सैनिकांचा सत्कार करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी कुडाळ तहसीलदार माननीय श्री. अमोल पाठक साहेब, पणदूर ग्रामपंचायत सरपंच मान. श्री दादा साईल, संस्था चेअरमन श्री. शशिकांत अणावकर सर, माजी सरपंच व प्रशालेचे माजी पर्यवेक्षक श्री. बाळा साईल सर, प्र. मुख्याध्यापक श्री. मिलिंद कर्पे सर, सर्व संस्था संचालक, सत्कारमूर्ती आजी-माजी सैनिक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्तविक प्रशालेचे प्र. मुख्याध्यापक श्री. कर्पे सर यांनी केले. यानंतर कलासंगमच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केले. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पंचक्रोशीतील उपस्थित आजी माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी सैनिक श्री. शामसुंदर सावंत यांनी- माजी सैनिक आणि त्यांचे कर्तव्य त्यासाठी लागणारे अशक्य परिश्रम त्याचबरोबर त्या कार्यक्षेत्रातील अनुभव कथन केले. माजी सैनिक श्री. बागवे साहेब यांनी अप्रतिम असे देश प्रेमाने उत्स्फूर्त भरलेले गीत गायन केले. प्रमुख अतिथी कुडाळ तहसीलदार मान. श्री अमोल पाठक साहेब यांनी “स्वातंत्र मिळवणे सोपे आहे, पण ते फार काळ टिकवणे मात्र खूप कठीण आहे. आपल्या भारत देशाने ते ७५ वर्षे अविरत टिकवले आहे. भारताच्या शेजारी असलेले देश त्यांना सुद्धा या दरम्यान स्वातंत्र मिळाले पण त्यांना तितके टिकविणे जमले नाही. आपला भारत देश अद्वितीय असा आहे. यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे तो सीमेवर देश संरक्षण करणाऱ्या सैनिकांचा आहे” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
पणदूर गावचे सरपंच मान. श्री दादा साईल यांनी आपली देशाप्रती असलेली निष्ठा व स्वातंत्र्य सैनिकांच्या बद्दल अभिमान व्यक्त केला. पणदूर गावचे माजी सरपंच व शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर हायस्कूलचे माजी पर्यवेक्षक मान. श्री. चंद्रकांत साईल सर यांनी अनेक कविता व संस्कृत सुभाषितांमधून स्वतंत्र सैनिक स्वातंत्र्याची ७५ वर्षे याबाबत मौलिक मार्गदर्शन केले. संस्था सहसचिव श्री. नागेंद्र परब यांनी सुद्धा स्वातंत्र काळातील पिढी व आजची पिढी यासंदर्भात भाषण केले. आजच्या पिढीची जबाबदारी खूप वाढली आहे असे उद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था अध्यक्ष मान. श्री अणावकर सर यांनी माझ्या शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर या प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी देशाची सैनिक म्हणून सेवा केली, त्यांना आज आजी- माजी सैनिकांचा मान मिळाला म्हणून प्रशालेच्या वतीने अशा निष्ठावान सैनिकांचा सत्कार करीत आहे. त्यांचा सत्कार करताना माझी मान अभिमानाने उंचावली आहे. या सर्व सैनिकांचा मानाचा मुजरा केला. आपल्या मौलिक भाषणातून या माजी विद्यार्थी आणि सैनिकांबद्दल सार्थ अभिमान व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. अविनाश वालावलकर सर यांनी आभार मानले.