You are currently viewing स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव –

स्वराज्य महोत्सव अंतर्गत सामुहिक राष्ट्रगीत गायनात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग

पोलीस बँड पथक आणि कळसुत्री बाहुल्या खेळ ठरले मुख्य आकर्षण

सिंधुदुर्गनगरी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सवास आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन जिल्हा नियोजन सभागृहात मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी सामुहिक राष्ट्रगीत गायन केले. यावेळी पोलीस बँड पथकाने देशभक्तीपर गितांची धुन वाजवून सर्वांची मने जिंकली. मुख्य आकर्षण ठरलेल्या या पथकाने देशप्रेमाचे वातावरण निर्माण केले. यानंतर दायती लोककला संवर्धन अकादमी निर्मिती ठाकरवाडी आदिवासी कलाग्रामने कळसुत्री बाहुल्यांच्या खेळामधून वीर विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनपट दाखवला.

                स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये स्वराज्य महोत्सव होत आहे. त्याअंतर्गत आज सामुहिक राष्ट्रगीत गायन झाले. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, पुरवठा विभागाच्या तहसिलदार तृप्ती धालवलकर यांच्यासह मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पोलीस बँड पथकाने केली वातावरण निर्मिती

                पोलीस बँड पथकाचे प्रमुख मेजर हॅन्ड्री लोबो यांच्या पथकातील हेड कॉन्सटेबल संजय मांजरेकर, लक्ष्मीकांत कांदळगावकर, जोसेफ फर्नांडिस, संतान घोन्सालविस, सिमान फर्नांडिस, संदेश सावंत, रवींद्र पावसकर, साहिल शेख, प्रवीण नेमळेकर, नमस्कार गुंडवडे, सुनील जाधव, प्रमोद हांडे, परेश चौधरी या सर्वांनी अतिशय लयबद्ध धून वाजवून आजपासूनच स्वातंत्र्यदिनाच्या महोत्सवाचे वातावरण निर्मिती केले. राष्ट्रगिताबरोबरच सारे जहांसे आच्छा, जयोस्तुते, बलसागर भारत होवो, हे राष्ट्र देवतांचे, ए वतन तेरे लिये, जहां डाल डाल पर अशा गितांची धून वाजवून मुख्य आकर्षण ठरले. टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी या पोलीस बँडचे कौतुक केले.

कळसुत्री बाहुल्यांच्या खेळामधून वीर सावरकरांचा जीवनपट

                दायती लोककला संवर्धन अकादमी निर्मिती ठाकरवाडी आदिवासी कलाग्रामचे कलाकार दिग्दर्शक कृष्णा मसगे, लेखक शिवदास मसगे, मीरा मसगे, श्रमिक मसगे, संस्कार मसगे, अमित मसगे, आनंद ठाकूर, श्रावणी मसगे, ऋषीकेश सिंगनाथ, भूषण सिंगनाथ, प्रकाश जिकमडे, श्रृती मसगे, सुनयना मसगे यांनी वीर विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनपट कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून प्रदर्शित केला. राष्ट्रपती पुरस्कार विजेते गणपत मसगे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम करण्यात आला.

ध्वज संहितेचे पालन करून ‘घरोघरी तिरंगा’ उत्साहात साजरा करा – के.मंजुलक्ष्मी

                यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. त्या निमित्ताने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होत आहे. याच महोत्सवाचा भाग म्हणून आजपासून स्वराज्य महोत्सव होत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी दि. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत ध्वज संहितेचे पालन करून घरोघरी तिरंगा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले.

                घरोघरी तिरंगा उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी दररोज ध्वज खाली उतरवण्याची आवश्यकता नाही. मात्र शासकीय कार्यालयांना ध्वज संहितेचे पालन करून ध्वज दररोज उतरवावा लागणार आहे.  जिल्हा परिषदेच्या मार्फत ग्रामीण भागासाठी नियोजन करण्यात आले असून नागरी भागासाठी नगर परिषद, नगर पंचायती नियोजन करत आहेत. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला त्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. लवकरच प्राधिकरणासाठी ध्वज वितरण केंद्र मुख्यालय स्तरावर सुरू होत आहे, असे सांगून  पोलीस बँड पथक आणि ठाकरवाडी आदिवासी कलाग्राम कलाकारांचे कौतुक करून जिल्हाधिकारी यांनी आभार मानले.

तिरंगा फडकविण्याचे नियम

            तिरंगा फडकविताना केशरी रंग वरच्या बाजुस असावा. तिरंगा झेंड्यामध्ये सर्वात वर केशरी, मध्यभागी पांढरा व खाली हिरवा रंग असेल अशाच प्रकारे झेंडा फडकवावा. घरोघरी तिरंगा हा 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत फडकलेला असेल. दररोज सायंकाळी तिरंगा उतरविण्याची आवश्यकता नाही. कार्यालयांनी ध्वजसंहिता पाळावी.  तिरंगा झेंडा उतरविताना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा. दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत हर घर झेंडा उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियान कालावधीनंतर प्रत्येकांनी सन्मामानाने व सुरक्षित ठेवावेत. अभियान कालावधीनंतर झेंडा फेकला जावू नये तो सन्मानाने जतन करुन ठेवावा. अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला झेंडा कोणत्याही परिस्थितीत लावला जावू नये.

           व्यापाऱ्यांनी प्लास्टिकच्या झेंड्यांची विक्री करू नये. तिरंगा फडकविण्यासाठी कापडी झेंड्यांचा वापर करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − seven =