You are currently viewing होशील का लहान…

होशील का लहान…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

*होशील का लहान…*

जगजीत सिंग ची एक गझल सहज आठवली.
ये दौलत भी ले लो
शोहरत भी ले लो
भले छीन लो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लौटा दे
बचपन का सावन
वह कागज की कष्ती
वो बारिश का पानी …

खरंच माणूस मोठा होत जातो. खूप काही मागे राहते. आयुष्याच्या प्रवाहात तो वाहत राहतो. पण एका संथ क्षणी नकळत तो मागे वळून बालपणीच्या आठवणीत हरवतो. रमतो. आणि मग मनात येतं, किती रम्य होतं ते सारं!! किती सुंदर होते ते दिवस! आनंदाचे, नाचायचे, बागडायचे, निरागस, निर्मळ. नव्हते हेवे दावे. नव्हत्या स्पर्धा, जीवघेणी चढाओढ,ईर्षा.

ती गल्ली आठवते. ती एकमेकांना चिकटून गुण्या गोविंदात नांदत असलेली घरे आठवतात. आणि घराघरातून असणाऱ्या सवंगड्यांची मैत्री, मस्ती, खेळ, भांडणेही. यात दिवस कसा संपायचा ते कळायचंच नाही. शाळा, अभ्यास, परीक्षा सारे होते. पास नापासचे तणाव होते. पण त्याहीपेक्षा जास्त परीक्षेनंतरच्या सुट्टीतले बेत अधिक आकर्षक होते.
.
गोट्या, विटी दांडू, लगोरी, सागर गोटे, पत्ते यासोबत खो-खो क्रिकेटही होतं. पण फळीची बॅट, काठ्यांचे स्टंप्स, दोरांचा चेंडू, काल्पनिक बाउंड्री, नानांच्या गॅलरीत बाॅल गेला की सिक्सर, आणि काल्पनिकच विकेट. काहीच नसायचं खेळाचं शास्त्रशुद्ध सामान. पण खेळ असायचा. खेळकर वृत्ती असायची. जिंकणं हरणं अलाहिदा! पण त्यातही एक समूह वृत्ती असायची.

नदीत डुंबायचं, डोंगरावर चढायचं , बोरं,करवंदासारखा रानमेवा खिसे भरभरून खायचा. पाऊस तर असायचाच कधी धो धो. कधी रिपरिपता. पण त्या धारांमध्ये मुक्त भिजणं आणि साचलेल्या पाण्यातलं ते थपथपणं . आणि त्या कागदी होड्या. ना कपड्यांवर पडलेल्या डागांची पर्वा ना नाकातून गळणाऱ्या शेंबडाची काळजी.
संध्याकाळच्या परवचा होत्या. दिव्यास देखून नमस्कार होते. घराघरात संस्कृतीचा वारसा होता. परंपरा होत्या. सण होते. गौरी गणपतीत घरोघर जाऊन मोठ्याने म्हटलेल्या आरत्या होत्या. दिवाळीत सारी गल्ली पणत्यांनी उजळायची. उंबरठ्यात रांगोळ्या सजायच्या. घराघरातून फराळाचे सुगंध पसरायचे. ना कसला कृत्रिम लखलखाट ना घमघमाट ना देखावा. साऱ्यात जपलेलं एक अनमोल असं आपुलकीचं. जिव्हाळ्याचं तत्व होतं.

कुठे गेले सारे? कुठे गेली ती गल्लीत नाचणारी, बागडणारी, धावणारी, शेजारच्या काकूंच्या खिडकीच्या काचा फोडणारी मुलं? बाळपणाची व्याख्याच बदलली का? पाटी पेन्सिल, खडूची जागा संगणकांनी घेतली. आकाशाखाली झाडांच्या सोबतीने खेळले जाणारे खेळ, सहा इंची….. जिला स्मार्ट म्हणायचे अशा पेटीत बंदिस्त झाले. मुलं त्यातच रमायला लागली. काल्पनिक सवंगड्यांबरोबर एकटी एकटी खेळायला लागली. देशी खेळाच्या जागा पाश्चात्य खेळांनी घेतल्या. तेही थाटामाटात. त्यांचा दिमाख सांभाळणारे किट्स मुलांच्या पाठीवर विराजमान झाले. हे सर्व दिसायला चांगलं असेलही पण यात काहीतरी खूप खोलवरचं हरवतेय् याचा विचार ना पालकांना..आणि मुलांना तर तो कसा असावा? आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या नावाने पालकांच्यातच स्पर्धा वाढल्या आणि त्यात लहान मुलांचं एक साधंसुधं निरागस बाळपण पार चिरडून गेलं.
पिळवटलं गेलं.

सुट्टी लागली…. निरनिराळ्या शिबिरात जा. गाता येतं ….?एखाद्या रियालिटी शोच्या रांगेत उभे रहा. नृत्य येतं….? स्पर्धेत लोटा. पडद्यावर चमका. लहान वयातच पैसा प्रसिद्धी.ग्लॅमर. आणि त्याचा शेवट काय? एका निरागस बाल्याला तिलांजली…

एक क्लास संपला की दुसर्‍या क्लासला धावा. कला, क्रीडा, ज्ञान गोळा करण्याची आस नव्हे, फक्त घाई. पाठीवरच्या दृष्य अदृष्य ओझ्याने वाकत चाललेलं हे बाळपण!!

त्यादिवशी खूप पाऊस पडत होता. रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालं होतं. दोन-तीन किलोमीटरचेच अंतर पण प्रचंड वेळ लागत होता. सहज गाडीची खिडकी उघडली. रस्त्याच्या कडेला झोपडपट्टी होती. एका काहीशा मोकळ्या जागेत दोन सावळी लहान मुलं पावसात मुक्त भिजत होती. अंगावर कपडेही नव्हते त्यांच्या. त्यांची आई तिथेच ओली लाकडं फुंकत होती. संध्याकाळच्या घासाची जमेल तशी तयारी करत होती. या मुलांना कसलीही पर्वा नव्हती. ती फक्त मुसळधार पावसाचा आनंद लुटत होती. मनात आलं,’ भविष्याचा अंधार असलेली ही मुलं.. गरिबीने खूप काही हिरावूनही घेतलं असेल ..पण एक गोष्ट मात्र टिकून आहे, त्यांचं निरागस बाल्य! त्या चिखलात कुठल्याही संस्काराविना उघड्या आकाशाखाली वाढणारी ही कण्हेरीची फुले मला रंगीन सुगंधी मनभावन वाटली त्याक्षणी.!

व्यथीत नक्कीच झाले. पण कितीतरी वेळ आठवत राहिलं ते त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं भिजलेलं मुक्त हास्य!!

परवा संध्याकाळच्या वेळी मी सोसायटीच्या गार्डनमध्ये बसले होते. एक लहान मुलगा सायकल चालवत होता. आठ नऊ वर्षाचाच असेल तो. थोड्यावेळाने तो माझ्याकडे आला. मला “हाय” म्हणाला.
” कशा आहात आँटी?”
सायकल वरून आता तो उतरला होता.
” मी छान आहे!”
मग मी त्याला विचारले,” शाळा सुरू झाली का तुझी ?”
“आंटी! मी शाळेत जातच नाही.”

” का रे बाबा? ”
” मला शाळा आवडतच नाही.”
” अरे! मग तू मोठा कसा होणार?”
” तुम्हाला कोणी सांगितलं की शाळेत गेलेला मुलगा मोठा होतो?”
मला धक्क्यावर धक्के बसत होते.
” मी माझा मीच घरीच शिकतो. मी आत्तापर्यंत दोनशे पुस्तके वाचली आहेत. तुम्ही पावलो कोहलेचं अल्केमिस्ट वाचले आहे? डेल कार्नीज वाचलाय्?द माॅन्क हू सोल्ड हिज फेरारी हे माझं सर्वात आवडतं पुस्तक आहे आंटी.”
सोळाव्या वर्षी गीता सांगणारे संत ज्ञानेश्वर आठवले मला.
पण मनात म्हटलं,” अरे मी तुझ्या एवढी होते ना तेव्हा ताम्हणकरांचं गोट्या वाचायची डेव्हिड कॉपर फिल्ड नाहीतर सिंदबादच्या सफरी चांदोबा किशोर वाचायची रे!”

धक्कादायक गप्पा करुन, सायकल वरून तो मुलगा काही वेळाने निघूनही गेला. मी त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात बसले आणि डोळे डबडबले माझे!
मी सुन्न झाले होते का थक्क झाले होते?मला त्याचे कौतुक वाटायला हवे होते का? मग मला त्याची कीव का करावीशी वाटत होती? एकंदरच
बदलत्या काळाकडे बघताना,निसर्गाच्या विरोधात जाणार्‍या जीवनाविषयी काही मत देताना मीच
भेलकांडले होते.हरवलेल्या वाटेवरून परतवण्यासाठी कुणाला हात देताना माझाच तोल
जात होता का..?जीवनाच्या या प्रचंड गतीत हरवलेले ते ठिपके मी वेचण्याचा फक्त प्रयत्न करत होते.
माझे मन आक्रंदत होते!

” नको रे असा अवेळी मोठा होऊस! हरवला आहेस तू. हरवले आहे तुझे बाळपण. लहान हो रे! थोडासा वेडा, वात्रट. मस्तीखोर,विस्कटलेला, मळलेला ही चालेल पण लहान हो.”
।। लहान पण देगा देवा ।
मुंगी साखरेचा रवा।।
हे कळेल का रे तुला बाळा..??

!! राधिका भांडारकर अमेरिका

प्रतिक्रिया व्यक्त करा